ऑक्सिजनची मागणी करतोय इंडोनेशिया
वृत्तसंस्था/ जकार्ता
भारतानंतर आता इंडोनेशियात कोरोनाच्या तीव्र लाटेमुळे ऑक्सिजनचे संकट निर्माण झाले आहे. इंडोनेशियाचे सरकार सिंगापूर, चीनसमवेत अन्य देशांकडून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी याच देशाने ऑक्सिजन संकटाला तोंड देणाऱया भारताला हजारो लीटर ऑक्सिजन पुरवून मदत केली होती. इंडोनेशियात आता लोकांना भरती करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नसल्याची स्थिती आहे.
सिंगापूरमधून शुक्रवारी 1 हजाराहून अधिक ऑक्सिजन सिंलिडर्स, कंसट्रेटर, व्हेंटिलेटर्स आणि अन्य आरोग्य उपकरणांची खेप देशात पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियातून देखील 1 हजार व्हेंटिलेटर्स पोहोचले आहेत. याचबारेबर सिंगापूरकडून 36 हजार टन ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन तयार करणाऱया 10 हजार कंसंट्रेटर खरेदीची योजना तयार केली जात असल्याची माहिती इंडोनेशियाचे मंत्री लुहुत बिन्साप पडजैतन यांनी दिली आहे.
चीन आणि संभाव्या ऑक्सिजन स्रोतांच्या संपर्कात आहोत. अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातने देखील मदतीचा प्रस्ताव दिला असल्याचे ते म्हणाले. इंडोनेशियाच्या रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नसल्याने अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. औषधांच्या तुटवडय़ामुळे लोकांना आपत्कालीन वैद्यकीय मदत देखील मिळू शकत नसल्याचे स्थिती आहे.
संक्रमण अत्यंत वेगवान
जगातील चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आतापर्यंत कोरोनाचे 24 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर 63,760 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी चाचण्या आणि संक्रमितांचा शोध घेण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळै हे आकडे प्रत्यक्षातील संख्येपेक्षा खूपच कमी असल्याचे मानले जाते. इंडोशियात गुरुवारी 39,000 रुग्ण सापडले होते.