भारताने हवाईक्षेत्र वापरण्याची दिली अनुमती- श्रीलंकेच्या दौऱयावर पाकिस्तानचे पंतप्रधान
वृत्तसंस्था / कोलंबो
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मंगळवारी दोन दिवसीय श्रीलंकेच्या दौऱयावर पोहोचले आहेत. भारताने या दौऱयाकरता इम्रान यांच्या विमानाला स्वतःच्या हवाईक्षेत्राच्या वापराची अनुमती दिली आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका तसेच सौदी अरेबियाच्या दौऱयावर गेले असता पाकिस्तानने भारताच्या पंतप्रधानांच्या विमानाला स्वतःच्या हवाईक्षेत्राचा वापर करण्यास मनाई केली होती.
इंटरनॅशनल एव्हिएशन ऑर्गनायजेशनच्या नियमांनुसार अतिमहनीय व्यक्तींच्या विमानाला हवाईक्षेत्राच्या वापराची मंजुरी द्यावी लागते, पण पाकिस्तानने या नियमांचे उल्लंघन केले होते. तर भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्याची स्वतःची भूमिका कायम ठेवली आहे.
दौऱयापूर्वी इम्रान यांना झटका
इम्रान खान यांच्या या दौऱयापूर्वीच श्रीलंकेतील गोटबाया राजपक्षे यांच्या सरकारने अत्यंत मोठे कूटनीतिक पाऊल उचलले आहे. इम्रान आता श्रीलंकेच्या संसदेला संबोधित करू शकणार नाहीत. भारताची नाराजी टाळण्यासाठी राजपक्षे यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. एक आठवडय़ापूर्वी इम्रान यांच्या श्रीलंका दौऱयाचे वेळापत्रक निश्चित झाले असता त्यात संसदेतील भाषणाचा कार्यक्रम नमूद होता. पण इम्रान हे काश्मीरचा उल्लेख करणार असल्याची भीती वाटू लागल्याने राजपक्षे सरकारने संसदेतील संबोधनाचा कार्यक्रमच रद्द केला आहे.
कोलंबोच्या वृत्तपत्रात लेख
श्रीलंकेतील कोलंबो गॅझेट या वृत्तपत्रात पाकिस्तानचे तज्ञ डार जावेद यांचा लेख प्रकाशित झाला आहे. श्रीलंका भारताच्या नाराजीची जोखीम पत्करू शकत नाही. श्रीलंका यापूर्वीच चीनच्या कर्जाच्या जाळय़ात अडकला असून भारत लसीसह प्रत्येक मुद्दय़ावर त्याला मदत करत आहे. तसेही श्रीलंकेतील मुस्लिमांसंबंधी बौद्ध समुदायात नाराजी असल्याचे मत डार यांनी व्यक्त केले आहे.