प्रतिनिधी / वास्को
भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने रविवारी गोव्यात कोरोना योध्दा दिवस गांभिर्याने साजरा करून कोरोनाविरूध्दच्या लढय़ात यशस्वीपणे झुंज देणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य खात्याचे कर्मचारी, पोलीस व या लढय़ात सहभागी असलेल्या इतरांना मनपूर्वक मानवंदना दिली. तटरक्षक दल आणि नौदलाने कोरोना योध्दय़ांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम वास्कोत आयोजित केले होते.
कोरोना योध्दय़ांना देशव्यापी मानवंदना देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून रविवारी सकाळी गोवा नौदल विभागाने गोव्यातील गोमेकॉ हॉस्पिटल, मडगावचे ईएसआय हॉस्पिटल तसेच चिखली वास्कोतील उपजिल्हा हॉस्पिटलवर हेलिकॉप्टरमधून फुलपाकळय़ांचा वर्षाव करून मानवंदना दिली. हॉस्पिटलच्या ठिकाणी नौदल जवान व अधिकारीही उपस्थित होते. कोरोनाविरूध्दच्या लढय़ात पोलिसांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन नौदलाने वास्को पोलीस स्थानकात पोलिसानांही मिठाई वाटली व त्यांचे अभिनंदन केले.
भारतीय तटरक्षक दलातर्फेही कोरोना योध्दा दिन साजरा
केंदीय सुरक्षा मंत्रालयाने केलेल्या आवाहनानुसार गोव्यात तटरक्षक दलाच्या विभागानेही कोरोना योध्दा दिवस गांभीर्याने साजरा करून या योध्दय़ांना मानवंदना दिली.
कोरोना योध्दा दिनानिमित्त तटरक्षक दलाने मुरगाव बंदरातील आपल्या तीन गस्ती जहाजांवर विद्युत रोषणाई केली होती. तटरक्षक दलाने मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलवर हेलिकॉप्टरमधून फुलपाकळय़ांचा वर्षावही केला. त्या ठिकाणी सुरक्षा दलांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य खात्याचे इतर कर्मचारी उपस्थित होते. गोव्याबरोबरच तटरक्षक दलाने देशभरात कोरोना दिन साजरा केला. देशातील किनारपट्टीचा समावेश असलेल्या पंचवीस ठिकाणी दलाने आपल्या जहाजांवर रोषणाई केली होती. शिवाय पाच ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर फुलपाकळय़ांचा वर्षाव केला.