आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत रविवारी तिसऱया दिवशी भारतीय नेमबाजांनी सांघिक प्रकारात गाजवित वर्चस्व दोन सुवर्णपदके पटकावली. पुरुष व महिला दोन्ही विभागातील 10 मी. एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताला ही पदके मिळाली आहेत.
यशस्विनी देसवाल, मनू भाकर व श्री निवेता या महिला त्रिकुटाने जबरदस्त प्रदर्शन करीत महिलांच्या सांघिक 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत सर्वोच्च यश मिळविले. भारतीय महिला संघाने सुवर्णपदकाच्या फेरीत 16 शॉट्स अचूक मारत पोलंडच्या जुलिता बोरेक, जोआना इवोना वावरोनोवस्का व ऍग्निस्क कोरेज्वो यांना मागे टाकले. पोलंडच्या त्रिकुटाला फक्त 8 शॉट्स अचूक मारता आले. त्यानंतर युवा ऑलिम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेता संघ सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा व शाहझर रिझवी यांनी पुरुष विभागात याच प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी व्हिएतनामच्या संघाला 17-11 अशा फरकाने सहज नमविले.
डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत पात्रतेच्या दुसऱया फेरीनंतर यजमान महिला संघाने एकूण 576 गुण घेत अग्रस्थान मिळविले तर पोलंड संघाने 567 गुण घेतले होते. पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारताने एकूण 1731 गुण घेताना 290, 287, 288, 287, 293, 287 असे गुण सहा सिरीजमध्ये मिळविले. पोलंडने या फेरीत 286, 283, 286, 286, 286, 287 गुण घेत एकूण 1701 गुण नोंदवले.
पुरुषांच्या अंतिम फेरीत दिन्ह थान्ह एन्ग्युएल, क्युओक कुआँग ट्रान व झुआन चुयेन फान यांनी व्हिएतनामचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या चौधरी आणि कंपनीने पात्रतेच्या दुसऱया फेरीत आघाडीचे स्थान मिळविताना 579 गुण तर व्हिएतनामच्या संघाने 565 गुण नोंदवले. पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारतीयांनी एकूण 1750 तर व्हिएतनामने 1708 गुण नोंदवले होते.
यशस्विनी देशवालला वैयक्तिक सुवर्ण
शनिवारी देसवालने महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारातही आपलीच सहकारी मनू भाकरला मागे टाकत वैयक्तिक सुवर्णपदक मिळविले होते. मनू भाकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरी व अभिषेक वर्मा यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.
गनेमत सेखाँला कांस्य
भारताची युवा नेमबाज गनेमत सेखाँने वरिष्ठ स्तरावर रविवारी पहिले वर्ल्ड कप पदक मिळविताना महिलांच्या स्कीट प्रकारात कांस्यपदक मिळविले. 20 वर्षीय गनेमत जागतिक क्रमवारीत 82 व्या स्थानावर असून 40 गुण नोंदवत तिने कांस्य मिळविले. तिने पात्रता फेरीत 117 गुण घेत तिसरे स्थान मिळविले होते तर 19 वर्षीय कार्तिकीने चौथे स्थान मिळविताना 116 गुण नोंदवले होते. या प्रकारात सहा महिलांनी अंतिम फेरी गाठली होती, त्यात भारताच्या कार्तिकी सिंग शक्तावतने चांगली सुरुवात केल्यानंतरही 32 गुण घेत चौथे स्थान मिळविले. गनेमतने बराच काळ दुसरे स्थान राखले होते. पण तिचे सलग 3 बर्ड्स हुकल्याने ती बाहेर पडली. त्यामुळे ग्रेट ब्रिटनची अँबर हिल व कझाकची झोया क्रॅव्हचेन्को यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या अंतिम लढतीत हिलने शूटऑफमध्ये निसटत्या फरकाने यश मिळवित सुवर्णपदक पटकावले.
2018 मध्ये झालेल्या आयएसएसएफ कनिष्ठांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्कीटमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान गनेमत सेखाँने मिळविला होता. वडिलांच्या आग्रहाखातर नेमबाज बनलेल्या गनेमतने वरिष्ठांच्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविण्याची हॅट्ट्रिक नोंदवली होती. जयपूरमध्ये 2018 साली झालेल्या स्पध्sा&त तिने यातील तिसरे रौप्य मिळविले होते. 53 देशांच्या एकू 294 नेमबाजांनी या स्पर्धेत भाग घेतला असून त्यात कोरिया, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड, तुर्की या देशांचा समावेश आहे.
पुरुषांच्या सांघिक एअर रायफल नेमबाजीत भारताला रौप्य
ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, दीपक कुमार, पंकज कुमार या भारतीय त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक एअर रायफल नेमबाजीत रौप्यपदक पटकावले. सुवर्णपदकाच्या लढतीत या त्रिकुटाने 14 गुण नोंदवत दुसरे स्थान मिळविले. अमेरिकेच्या लुकास कोझेनीस्की, विल्यम शॅनर, तिमोथी शेरी यांनी 16 गुण घेत सुवर्णपदकाचा मान मिळविला. दक्षिण कोरियाच्या संघाने कांस्यपदक मिळविले. पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारतीय संघाने 1885.9 गुण घेत पहिले, अमेरिकेने 1880.8 गुण घेत दुसरे तर इराणने 1869.7 गुण घेत तिसरे स्थान मिळविले होते.
यातील महिला विभागात भारताच्या निशा कंवर, श्रीयांका शदांगी, अपूर्वी चंडेला यांनी 623.7 गुण नोंदवत चौथे स्थान मिळविले. पोलंडच्या पथकाने 624.1 गुण घेत कांस्य मिळविले तर अमेरिकन महिलांनी 627.3 गुण घेत सुवर्ण व डेन्मार्कच्या पथकाने 625.9 गुण घेत रौप्यपदक मिळविले.