वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या होणाऱया आगामी विश्व टूर सुपर 1000 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी सायना नेहवालसह भारतीय बॅडमिंटन संघाने रविवारी थायलंडला प्रयाण केले. दरम्यान या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सध्या ब्रिटनमध्ये सराव करत असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू लंडनहून थेट थायलंडमध्ये दाखल होणार आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. या महामारीनंतर थायलंडमधील ही पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत आहे. रविवारी थायलंडला रवाना झालेल्या भारतीय बॅडमिंटन संघामध्ये पी. कश्यप, सायना नेहवाल, बी. साईप्रणित आणि किदांबी श्रीकांत यांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये सराव करत असलेली पी.व्ही. सिंधू दोहामार्गे बॅकाँकमध्ये दाखल होणार आहे.
थायलंडमधील या दोन आगामी आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 12 ते 17 जानेवारी दरम्यान योनेक्स थायलंड खुली तसेच 19 ते 24 जानेवारी दरम्यान टोयाटो थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा खेळविली जाणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघामध्ये एच. एस. प्रणॉय, पी. काश्यप, समीर वर्मा, धृव कपिला, मनु अत्री यांचा समावेश असून हे बॅडमिंटनपटू रविवारी हैद्राबाद येथून दुबईमार्गे बॅकाँकला रवाना झाले.