वृत्तसंस्था/ डुसेलडॉर्फ, जर्मनी
जर्मनी दौऱयावर असणाऱया भारतीय महिला हॉकी संघाला चौथ्या व शेवटच्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला. जर्मनीने भारतावर 2-1 अशी मात केली.
नाओमी हेइन (29 वे मिनिट), चार्लोट स्टेपनहॉर्स्ट (37) यांनी जर्मनीचे गोल नोंदवले तर भारताचा एकमेव गोल लालरेमसियामीने 51 व्या मिनिटाला नोंदवला. भारताचा हा या दौऱयातील सलग चौथा पराभव होता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिराने सुरू करण्यात आला होता. पण जर्मनीच्या महिलांनी प्रारंभापासूनच आक्रमणास सुरुवात केली आणि दहाव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण सविता व अन्य बचावपटूंनी हा धोका टाळण्यात यश मिळविले. पुढच्याच मिनिटाला भारतानेही पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्यावर जर्मनीनेही अप्रतिम बचाव केल्याने गोलफलक कोराच राहिला होता. दुसऱया सत्राच्या अखेरीस व तिसऱया सत्रात जर्मनीने गोल नोंदवले तर शेवटच्या सत्रात भारताने एक गोल नोंदवला.