पाहुण्या संघाचे मालिकाविजयावर यापूर्वीच शिक्कामोर्तब
लखनौ / वृत्तसंस्था
द. आफ्रिकन संघाविरुद्ध वनडे मालिका यापूर्वीच गमावलेल्या भारतीय महिला संघासाठी आजची पाचवी व शेवटची लढत निव्वळ औपचारिक स्वरुपाची असणार आहे. दक्षिण आफ्रिकन महिला संघ 5 सामन्यांच्या या मालिकेत 3-1 फरकाने विजयी आघाडीवर आहे. आजची लढत सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
भारतीय महिला संघ तब्बल वर्षभराच्या सक्तीच्या ब्रेकनंतर प्रथमच मैदानात उतरताना अजिबात फॉर्ममध्ये दिसून आला नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी कोव्हिड-19 ब्रेकनंतर ही दुसरी मालिका होती. यापूर्वी मायभूमीत त्यांनी पाकिस्तानचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडला होता.
भारतीय संघाला या मालिकेत आघाडीवीर शेफाली वर्मा व गोलंदाजीत शिखा पांडेची प्रकर्षाने उणीव जाणवली. राजेश्वरी गायकवाडचा अपवाद वगळता अन्य भारतीय फिरकीपटू कमालीच्या निष्प्रभ ठरल्या. दक्षिण आफ्रिकन संघाने या मालिकेतील तिसऱया व चौथ्या सामन्यात अनुक्रमे 249 व 267 धावांचा सहज पाठलाग करत विजय संपादन केला होता.
वरिष्ठ फिरकी गोलंदाज पूनम यादवला चार सामन्यात एकदाही सूर सापडला नाही. त्यामुळे, आता या शेवटच्या सामन्यात तिला अंतिम संघात स्थान मिळणार का, हे पहावे लागेल. अनुभवी जलद गोलंदाज झुलन गोस्वामीने 3 सामन्यात सर्वाधिक 8 बळी घेतले असून चौथ्या सामन्यात ती खेळली नव्हती. आघाडीवीर पूनम राऊतने फलंदाजीत 10, नाबाद 62, 77 व नाबाद 104 असे लक्षवेधी प्रदर्शन साकारले आहे. कर्णधार मिताली राज व उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे तर स्टार सलामीवीर स्मृती मानधना केवळ दुसऱया लढतीत चमकली आहे.
जेमिमा रॉड्रिग्जने 1, 9, 0 अशा सलग 3 सामन्यात अपयशी कामगिरी केली आणि चौथ्या सामन्यात तिला संधी दिली गेली नव्हती. या मालिकेदरम्यान कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा सर करणाऱया मिताली राजने आतापर्यंत खेळलेल्या 3 डावात 50, 36 व 54 धावांचे योगदान दिले. ती दुसऱया सामन्यात खेळली नव्हती. दुसऱया सामन्यात 80 धावांनी विजय मिळवून देणारी खेळी साकारणाऱया स्मृतीला अन्य 3 डावात अनुक्रमे 14, 25 व 10 धावा जमवता आल्या आहेत.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकन महिला संघाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर सरस कामगिरी साकारली असून केवळ दुसऱया सामन्यात त्यांना अपयश आले. त्यांची सलामीची फलंदाज लिझेली ली ही 288 धावांसह आघाडीवर असून तिने 4 सामन्यात नाबाद 83, 4, नाबाद 132 व 69 धावांचे योगदान दिले आहे. तिसरा सामना एकहाती जिंकून देण्यात ती यशस्वी ठरली. तिला लॉरा (154 धावा) व गुडॉल (124 धावा) यांची समयोचित साथ लाभली आहे. गोलंदाजीत शबनीम इस्माईलने आफ्रिकेतर्फे 4 सामन्यात सर्वाधिक 7 बळी घेतले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारतीय महिला ः मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर, डी. हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), स्वेता वर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल.
दक्षिण आफ्रिकन महिला ः सून लुस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनीम इस्माईल, लॉरा वोल्वार्द, त्रिशा चेट्टी, सिनालो जाफ्ता, तस्मिन ब्रिट्झ, मेरिझेन कॅप्प, नोंदुमिसो शांग्से, लिझेली ली, ऍनेके बोश्च, टय़ुनिक्लाईफ, नोन्पुलूलेको, मिग्नॉन डय़ू प्रीझ, नॅदिने डे क्लर्क, लारा गुडॉल, सेखूखुने.
सामन्याची वेळ ः सकाळी 9 पासून.