वृत्तसंस्था / जमशेदपूर
येथे झालेल्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या 2022 सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेंचे अजिंक्यपद यजमान भारताने पटकाविले. या स्पर्धेत भारतीय महिला संघातील लिंडा कॉमने एकूण पाच गोल नोंदवीत मालिकावीराचा बहुमान मिळविला. या स्पधेंत भारतीय महिला फुटबॉल संघाला सरस गोल सरासरीच्या जोरावर विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात पाचव्या मिनिटाला भारतीय संघातील शुभांगीने मारलेला फटका बांगलादेशच्या गोलरक्षकाने थोपविला. 40 व्या मिनिटाला नितूचा फटका गोलपोस्टच्या वरून गेल्याने भारताला खाते उघडता आले नाही.
60 व्या मिनिटाला कर्णधार शिल्कीदेवीचा गोल करण्याचा प्रयत्न अयशस्यवी ठरला. 74 व्या मिनिटाला प्रियांकाने भारताचा एकमेव गोल नोंदविला. या स्पर्धेत भारताने +11 तर बांगलादेशने + 3 अशी गोल सरासरी राहिल्याने या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाला विजेता म्हणून घाषत करण्यात आले.