वृत्तसंस्था/ झेरक्वा (जॉर्डन)
बुधवारी येथे झालेल्या पहिल्या मित्रत्वाच्या महिला फुटबॉल आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने मानांकनातील तळाच्या इजिप्तचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. प्रिन्स मोहम्मद स्टेडियमवर झालेला हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा ठरला.
भारतीय महिला फुटबॉल संघाने खेळाच्या पूर्वार्धात आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर इजिप्तवर दडपण आणले. सामन्यातील 18 व्या मिनिटाला कर्णधार आशालता देवीने अंजूच्या पासवर गोल करण्याचा प्रयत्न केला पण आशालता देवीचा फटका इजिप्तच्या गोलरक्षकाने थोपविला. 20 व्या मिनिटाला भारतीय संघातील मनिषाने इजिप्तच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण तिला या संधीचा फायदा उठविता आला नाही. सामन्यातील 30 व्या मिनिटाला प्रियांका देवीने भारताचा एकमेव आणि निर्णायक गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने इजिप्तवर 1-0 अशी आघाडी मिळविली.
भारतीय संघातील दालीमाने दिलेल्या पासवर प्रियांका देवीने हा गोल नोंदविला. सामन्याच्या उत्तरार्धात भारतीय संघाने गोल करण्याच्या किमान चार संधी वाया घालविल्या. 53 व्या मिनिटाला प्यारीच्या पासवर मनिषाने मारलेला फटका इजिप्तच्या गोलरक्षकाने थोपविला. जॉर्डनमधील भारताचा हा पहिला विजय आहे. एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाला प्राथमिक फेरीतच बाद व्हावे लागले होते. ही स्पर्धा गेल्या जानेवारी -फेब्रुवारी दरम्यान भारतामध्ये घेण्यात आली होती.