वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रानी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अर्जेंटिनाकडे प्रयाण केले आहे. कोरोना महामारी समस्येमुळे जवळपास वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
बेंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे गेल्या काही महिन्यापासून सराव शिबीर आयोजित केले होते. अर्जेंटिनाच्या दौऱयात भारतीय महिला हॉकी संघ चार सामने खेळणार आहे. 26, 28, 30, 31 जानेवारीला भारतीय महिला हॉकी संघाचे सामने बलाढय़ अर्जेंटिना महिला हॉकी संघाबरोबर होणार आहेत. जागतिक महिला हॉकी संघाच्या मानांकनात अर्जेंटिना सध्या दुसऱया स्थानावर आहे. या दौऱयात भारतीय महिला संघ दोन सामने अर्जेंटिनाच्या कनिष्ठ महिला संघाबरोबर तसेच उर्वरित दोन सामने अर्जेंटिना ब संघाबरोबर खेळणार आहे. अर्जेंटिनाच्या दौऱयावर रवाना होण्यापूर्वी या संघातील सर्व खेळाडूंची तसेच प्रशिक्षक वर्गाची 72 तास अगोदर कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे या संघाला अर्जेंटिनात दाखल झाल्यानंतर क्वारंटाईनची गरज भासणार नाही.