ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
भारतीय वंशाचे अमेरिकी नागरीक आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत. मायक्रोसॉफ्टने बुधवारी सत्या नाडेला यांना कंपनीचे अध्यक्ष बनविले आहे. सत्या नाडेला आता जॉन थॉम्पसन यांची जागा घेणार आहेत.
सत्या नाडेला हे 2014 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ झाले होते. त्यानंतर त्यांची लिंकडइन, न्यूनस कम्युनिकेशन आणि जेनीमॅक्स यासारख्या अनेक कंपन्यांच्या अब्जावधी डॉलर्सच्या अधिग्रहणात महत्वाची भूमिका निभावली होती.
मायक्रोसॉफ्टने एक निवेदन जारी करत सत्या नाडेला यांना अध्यक्ष करीत असल्याची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सत्या नाडेला आता कंपनीचे नवीन अध्यक्ष असतील. सत्या नाडेला यांच्यापूर्वी थॉम्पसन अध्यक्ष होते. थॉम्पसन आता प्रमुख स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून राहतील. 2014 मध्ये बिल गेट्स यांच्या नंतर कंपनीचे अध्यक्ष झाले होते.
सत्या नाडेला ज्यावेळी कंपनीचे सीईओ झाले म्हणजेच 2014 मध्ये कंपनी मोठ्या संकटातून जात होती. मायक्रोसॉफ्टचे अनेक प्रयोग फसले होते. यामध्ये नोकिया – विंडोज – ओएसचा समावेश आहे. नाडेला यांनी कंपनीला संकटातून बाहेर काढले. यासोबतच क्लाउड कॉम्प्युटिंग, मोबाईल ॲप्लिकेशन आणि आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर लक्ष वळवून पुन्हा सॉफ्टवेअर निर्मितीला चांगले दिवस दाखविले.
- हैदराबादमध्ये नाडेला यांचे झाले शालेय शिक्षण
सत्या नाडेला यांचा जन्म 1967 साली हैदराबादमध्ये झाला. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आणि आई संस्कृत शिक्षिका होती. त्यांनी प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये घेतल्यानंतर 1988 मध्ये मणिपाल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये एम ए करीत अमेरिका गाठले आणि 1996 मध्ये शिकागो येथील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले.