लडाख / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एका वर्षापेक्षा जास्त काळापासून असलेला वाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱयांमध्ये शनिवारी कमांडर-स्तरीय बैठक होणार आहे. लष्करी पातळीवरील चर्चेची ही बारावी फेरी आहे. ही बैठक चीनच्या बाजूने मोल्दो येथे होणार आहे. सकाळी 10.30 वाजता बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत गोग्रा येथील हॉट स्पिंग आणि डिसएंगेजमेंटवर बोलणी होणार असल्याची माहिती लष्करी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या दोन्ही बिंदूंवर दोन्ही बाजूंनी फक्त 30-35 सैनिक तैनात आहेत. तसेच डेमचॉक आणि डेपसांगचा मुद्दाही चर्चेत उपस्थित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयाने सांगितले. डेमचॉक भागात चिनी सैनिक तसेच नागरिकांसाठी तंबू आहेत.
लडाखमधील वातावरण अद्याप थंड झालेले नसताना आता चिनी सैन्याने उत्तराखंड भागातील सीमावर्ती भागामध्ये हालचाली सुरू केल्याचे मागील आठवडय़ातच दिसून आले होते. तिढा सोडविण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱया सुरू असतानाच चीनच्या कुरापतींचे सत्र मात्र थांबलेले दिसत नाही. चीन वारंवार भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताची बारीक नजर असून चीनच्या या नव्या कुरापतींमुळे संरक्षण दल अलर्टवर आहे.
चीन वारंवार भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी सुरू असलेल्या लडाख सीमेवरील चीनच्या हालचालीही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता लडाखपासून अगदी जवळ तिसरा लष्करी हवाईतळ उभारण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकचे परिसरात चीनचा नवा एअरबेस तयार केला जात आहे. काशगर आणि होगान इथे आधीपासूनच चीनचे हवाईतळ असून या दोहोंमधील अंतर 400 किलोमीटर इतके आहे. आता या दोन्ही तळांच्या मधोमध तिसरा एअरबेस उभारून चीन लॉजिस्टिकची अडचण संपवत असल्याचीही चर्चा आहे.