मोदींच्या दौऱ्यापूर्वी व्हाईट हाऊसकडून कौतुक : हवं तर दिल्लीत जाऊन अनुभव घ्या
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारतातील लोकशाहीसंबंधी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल व्हाईट हाऊसकडून महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली आहे. भारत एक जिवंत लोकशाही आहे. नवी दिल्ली येथे गेलेला प्रत्येक जण या लोकशाहीचा अनुभव घेऊ शकतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान आम्ही लोकशाहीवादी संस्थांच्या सामर्थ्यावरही चर्चा करू असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. हा प्रश्न एका पाकिस्तानी वंशाच्या महिला पत्रकाराने विचारला होता.
भारत अनेक स्तरांवर अमेरिकेचा मजबूत भागीदार आहे. भारत हा क्वाडचा सदस्य तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात आमचा खास मित्र आहे. शांगरी-ला डायलॉगमध्ये संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी भारतासोबत अतिरिक्त संरक्षण सहकार्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अनेक स्तरांवर महत्त्वपूर्ण आहेत. अध्यक्ष जो बिडेन हे पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यावेळी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील. दोन्ही देशांमधील भागीदारी वृद्धींगत करणे हे आमचे लक्ष्य असल्याचे किर्बी म्हणाले.
आम्ही कुठल्याही मुद्द्यावर बोलण्यास टाळाटाळ करत नाही. आमच्या मित्रदेशांसोबत आम्ही कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील मैत्री आणि भागीदारी वाढविण्याचा असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21-24 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान 350 लढाऊ विमानांच्या इंजिन्सची भारतात निर्मिती करण्याच्या दृष्टीने मोठा करार होण्याची शक्यता आहे. याचबरोबर 22 हजार कोटी रुपयांद्वारे 30 एमक्यू-9बी सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याचा करारही होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन हे व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ प्रीतिभोजनाचे आयोजन करणार आहेत. तर दौऱ्याच्या अंतर्गत 22 जून रोजी पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या संसदेला संबोधित करतील.