प्रतिनिधी/ म्हापसा
दारू पिण्यासाठी पैशाची मागणी आपल्या बहिणीकडे केली असता बहिणाने पैसे न दिल्याने रागाच्याभरात सख्या भावाने आपल्या बहिणीच्या डोक्यावर गंभीररीत्या वार करीत डोक्याचा चेंदामेंदा होईपर्यंत मारहाण करून खून करण्यात आला. या खूनामुळे पोलीसही खडबडून जागे झाले होते.
फुलदेंवाडा- नागोवा येथे भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया अनासुया परसाप्पा लमाणी (26) मूळ गदग कर्नाटक या तरुणीचा गुरुवारी रात्री तिच्या सख्या लहान भावाकडून डोक्यात बॅट हाणून निघृण खून झाल्याचा भयानक प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्याची माहिती हणजूण पोलिसांकडून मिळाली. दरम्यान या खुनात सहभागी असल्याच्या संशयावरून शेकप्पा लमाणी यास 48 तासाच्या आत गदग कर्नाटक येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती निरीक्षक सुरज गांवस यांनी दिली.
हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागवा-हडफडे पंचायत क्षेत्रातील अजय आरोलकर यांच्या मालकीच्या घरात भाडोत्री म्हणून राहणाऱया अनासुया लमाणी यांच्या बंद खोलीतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालक आरोलकर यांनी हणजूण पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरज गांवस तसेच उपनिरीक्षक अमीत तरल यांच्या उपस्थितीत खोलीचा दरवाजा उघडला असता हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. यावेळी अज्ञाताकडून अनासुयाचे डोके क्रिकेटच्या बॅटने चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
सुरुवातीला कुणातरी अज्ञाताकडून अनासुयाचा खून झाल्याचे गृहीत धरून त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता मृत अनासुयाचा छोटा भाऊ शेकप्पा लमाणी बुधवारपासून घरात नसल्याची रीतसर तक्रार मृत अनासुयाचा मोठा भाऊ हेमप्पा लमाणी (सध्या राहणारा बागा-कळंगूट) याच्याकडून हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी तपासाची दिशा उलट दिशेने फिरवित स्थानिक ग्रामस्थ तसेच हडफडे परिसरातील लमाणी समुदायाच्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून अनासुयाचा छोटा भाऊ शेकप्पा लमाणी अनासुयासह एकाच खोलीवर राहात असल्याची त्यांना माहिती मिळाली. मात्र संशयित शेकप्पा लमाणी हा बेरोजगार तसेच व्यसनी असल्याने दारूसाठी पैशांची मागणी करीत शेकप्पाची अनासुयाशी अनेकदा कडाक्याची भांडणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान या माहितीचा धागा पकडून हणजूण पोलिसांनी उलट दिशेने तपासाची चक्रे फिरविली असता शेकप्पा लमाणी याने गदग कर्नाटक येथील आपल्या मूळ गावी पळ काढल्याची पुसटशी माहिती पोलिसांना मिळाली. हणजूण पोलीस निरीक्षक सुरज गांवस तसेच उपनिरीक्षक अमीत तरल यांनी रातोरात गदग कर्नाटक गाठले आणि संशयित खुनी शेकप्पा लमाणी याला अटक केली.