शासन आदेश उल्लंघनासह विनापरवाना रॅली काढल्याची फिर्याद
प्रतिनिधी/ कराड
पंढरपूर आषाढी वारी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रद्द केली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून हभप बंडातात्या कराडकर हे पायी वारी काढत असताना त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी सोमवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरूजी यांनी दत्त चौक ते तहसील कार्यालय असा विनामास्क, विनापरवाना मोर्चा काढला. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत वसंतराव पाटील यांच्या फिर्यादीवरून भिडे गुरूजींसह 80 जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सध्या कोरोना संसर्ग विषाणू संक्रमण तोडण्याच्या अनुशंगाने संचार बंदी चालू आहे. 2021 साली कोरोना या रोगाचा प्रसार वाढू नये म्हणून आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे भाविकांना पायी दिंडीने जाण्यास शासनाने बंदी घातली आहे. परंतु हभप बंडातात्या कराडकर यांनी शासन आदेशाचे उल्लंघन करून आषाढी वारीकरिता पंढरपूर येथे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व करवडी येथे स्थानबद्ध केले. बंडातात्या कराडकर यांच्या, सर्व भाविकांना आषाढी कार्तिकी वारीसाठी पंढरपूर येथे पायी दिंडीने जाण्यास शासनाने परवानगी द्यावी, या मागणीला समर्थन देण्याकरिता सोमवारी 5 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कराडच्या दत्त चौक येथे
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरूजी) हे आले. त्यावेळी दत्त चौक कराड येथील साईबाबा मंदिराचे पुजारी जय पुरोहित (रा. आगाशिवनगर ता. कराड) यांनी मंदिरे बंदचा आदेश असताना मंदिर उघडून
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 80 धारकरी यांना मंदिर उघडून आत बसून दिले. त्यानंतर सागर जयसिंग आमले तसेच संभाजीराव भिडे (गुरुजी), अजय पावसकर, केदार डोईफोडे, प्रविण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर हे कार्यकर्त्यांसह विनामास्क दत्त चौकात आले. तेथून त्यांनी कराड तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली. विनापरवाना, विनामास्क रॅली काढून शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.