रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयाचा उपक्रम : मधुसुदन या विद्यार्थ्याने 6 चित्रे रेखाटली
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी कार्यालये व त्या सभोवतालचा परिसर हा तसा गलिच्छ पाहायला मिळतो. परंतु या भिंतींचा वापर समाज प्रबोधनासाठीही करून घेता येतो, हे रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयाने दाखवून दिले आहे. कर्मचाऱयांनी एकत्रित येऊन भिंती रंगवून घेतल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच या चित्रांवर ग्राहकांची नजर पडत आहे.
कार्यालयाच्या बाजूला असणाऱया संरक्षक भिंतींना रंगकाम करून घेण्यात येत होते. या भिंती रंगकाम करताना त्यामध्ये सामाजिक संदेश व विजेविषयी माहिती द्यावी, या उद्देशाने सर्व कर्मचारी एकत्रित आले. या सर्वांनी आपापल्या खिशातील रक्कम खर्च करून या भिंती रंगविण्याचा निर्णय घेतला. मधुसुदन या विद्यार्थ्याकडून भिंती रंगवून घेण्यात आल्या. त्यामुळे ही चित्रे चर्चेचा विषय ठरली आहेत.
सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न
विजेच्या खांबाला जनावरे बांधू नये, जेथून वीजवाहिन्या गेल्या आहेत, त्या ठिकाणी पतंग उडवू नये, विजेच्या वाहिन्यांना कोणत्याही साहित्याचा स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी, विद्युत खांबावरून दोरी टाकून कपडे सुकण्यास टाकू नयेत, असे संदेश या चित्रांद्वारे देण्यात आले आहेत. विद्युत कर्मचारी काम कसे करतात, याचीही माहिती देण्यात आली आहे. एकूण 6 चित्रांचा समावेश आहे.