युवा काँग्रेसचा इशारा
वार्ताहर /शिवोली
भूमिपुत्र विधेयक मागे न घेतल्यास आंदोलन छेडू असा इशारा युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी हणजूण येथे दिला. हणजूण येथे युवा काँग्रेसची सभा झाली. यावेळी युवा काँग्रेस व काँग्रेस नेते उपस्थित हाते. शिवोली युवा काँग्रेसतर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवोली युवा काँग्रेस अध्यक्ष ऍड. रोशन चोडणकर यांच्या पुढाकाराने आयोजित सभेला माजी समाजकल्याणमंत्री ऍड. चंद्रकांत चोडणकर, दत्ताराम पेडणेकर, शिवोली महिला काँग्रेस अध्यक्ष पार्वती नागवेकर, ऍड. रोशन चोडणकर युवा काँग्रेसचे सदस्य यश कोचरेकर, विवेक डिसिल्वा व इतर उपस्थति होते. भूमिपुत्र अधिकारणी विधेयक घाईघाईने विधानसभेत संमत केले आहे. त्याला संविधानिक मंजूरी नाही. सदर विधेयक गोवेकरांच्या हिताचे नाही त्यामुळे गोवेकरांना त्याला कसलाच लाभ होणार नाही. हे विधेयक मागे न घेतल्यास दहा हजार लोकांना घेऊन मोर्जा काढू असा इशारा ऍड. म्हार्दोळकर यांनी दिला.
डिजिटल इंडिया : राजीव गांधीची संकल्पना
डिजिटल इंडिया संकल्पना आपल्या कार्यकाळात सुरु झाली म्हणणारे भाजपा सरकाराने लक्षात घ्यावे की स्व. राजीव गांधी यांनी ही संकल्पना आणली होती. हल्लीच केंद्र सरकारकडून ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. लोकांची मागणी असल्यानेच हे नाव बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून दिले जात आहे. पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, अशी लोकांची मागणी आहे. हि मागणी सरकार पूर्ण करेल का? असा प्रश्न ऍड. रोशन चोडणकर यांनी केला. काँग्रेस पक्षाने भारताला स्वतंत्र मिळवून दिले तसेच गोवा पोतुर्गीजांच्या राजवटीतून सोडून आणण्यास मदत केली. कोविड काळात अडलेल्या नडलेल्या मदत पुरविली. हल्लीच सलग पडलेल्या पावसामुळे पूर आलेल्या ठिकाणी भेट देऊन तेथील लोकांना मदत केली. शिवोलीतून युवा काँग्रस कमिटी नोंदण्यासाठी नावे आलेली आहेत. त्यांची पक्षश्रेष्ठींकडून नावे मंजूर करून घेऊन लवकरात लवकर कमिटी स्थापन करण्यात येईल. असे ऍड. रोशन चोडणकर यांनी उपस्थितांना सांगितले. पार्वती नागवेकर, ऍड. चंद्रकांत चोडणकर, दत्ताराम पेडणेकर, यश कोचरेकर यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सर्वानी एकसंघ राहून शिवोलीत काँग्रेस पक्षाला विजयी करण्यास एकसंघ राहावे असे आवाहन करण्यात आले.