ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोना संकटात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर दिवसरात्र मेहनत करत आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेश मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाजापूर येथील एका रुग्णालयात 60 वर्षाच्या वृध्द व्यक्तीस रुग्णालयाचे बिल न भरल्याने बेडला बांधून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. तसेच या वृद्धाच्या मुलीने देखील रुग्णालय प्रशासनावर वडिलांना बांधून ठेवल्याचा आरोप देखील केला आहे.
या घटनेचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींना सोडणार नाही असा इशारा दिला आहे.
तर वृध्द व्यक्तीच्या कुटुंबाने आरोप करताना म्हटले आहे की, बिलाचे 11 हजार रुपये देऊ न शकल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णाचे हात आणि पाय बेडला बाधून ठेवले. मात्र, यावर रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, त्यांना त्रास होत असल्याने ते रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांना बेडला बांधण्यात आले होते. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत बोलताना जिल्हा कलेक्टरांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम रुग्णालयात पाठवली आहे. तसेच पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे. लवकरच तपासाचे रिपोर्ट आम्हाला मिळतील त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.