प्रतिनिधी/ सातारा
कराड-ढेबेवाडी मुख्य रस्त्यावर मानेगाव (ता.पाटण) गावच्या हद्दीत दोन चारचाकी गाडय़ांची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये भोसगाव (ता.पाटण) येथील माजी सैनिक संदिप (पिंटू) भिमराव देशमुख वय 45 यांचा अपघातात जागीच मुत्यू झाला आहे. दोघेजण गंभीर जखमी झाले असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात बुधवारी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10 च्या सुमारास भोसगाव येथील माजी सैनिक संदिप भिमराव देशमुख हे आपल्या चारचाकी गाडीतून कराडला निघाले होते. मानेगाव प्राथमिक शाळेच्या समोरील वळणावर त्यांची गाडी व समोरून येणारी चारचाकी गाडी यामध्ये जोराची धडक झाली. यामध्ये जखमी झालेल्यांना कराड येथे उपचारास नेहण्यात आले. संदीप देशमुख यांना कराड येथील वेणूताई चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नेहत असताना मयत झाले. तर रोहित सावंत सावंतवाडी (काळगाव) व प्रदीप मुटल मुटलवाडी (काळगाव) दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेच दोघे किरकोळ जखमी झाले असल्याची माहीती ठाणे अंमलदार शेवाळे यांनी दिली.
मानेगाव येथील वळण धोकादायक असून समोरच शाळा असल्याने मुलेही येत- जात असतात. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.