बेळगाव, गोकाक, बैलहोंगलसह 60 हून अधिक ठिकाणी एसीबीची कारवाई, कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱयासह एकूण 15 भ्रष्ट अधिकाऱयांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाच्या (एसीबी) अधिकाऱयांनी बुधवारी छापे टाकले. राज्यातील गोकाक, सौंदत्ती, बेळगावसह मंगळूर, गुलबर्गा, मंडय़ा, गदग, बेंगळूर आणि बळ्ळारी येथील 60 हून अधिक ठिकाणी एसीबीच्या 408 अधिकाऱयांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱयांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. छाप्यादरम्यान, कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे.
काही दिवसांपूर्वीच एसीबीच्या अधिकाऱयांनी बेंगळूरसह विविध जिल्हय़ांमध्ये छापे टाकले होते. यानंतर पुन्हा भ्रष्ट अधिकाऱयांचा शोध घेऊन त्यांच्यावरील धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी एकाचवेळी 15 भ्रष्ट अधिकाऱयांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकून कोटय़वधी रुपयांची रोकड, सोने-चांदीचे दागिने, अवैध मालमत्ता उघडकीस आणले आहेत. अधिकाऱयांनी अवैध मार्गाने जमवलेली माया पाहून एसीबीच्या अधिकाऱयांना धक्काच बसला.
एसीबीच्या जाळय़ात अडकलेल्या अधिकाऱयांनी जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी शेकडो तक्रारी आल्याने एसीबीने या अधिकाऱयांची माहिती जमवत एकाचवेळी धाडी टाकल्या. बेळगावमधील हेस्कॉम क श्रेणी कर्मचारी नाथाजी हिराजी पाटील यांच्या मालमत्तांवर छापे टाकून बेहिशेबी मालमत्तेचा तपशील जमा करण्यात येत आहे. बेळगाव जिल्हय़ाच्या गोकाकमधील आरटीओ इन्स्पेक्टर सदाशिव मरलिंगण्णवर यांच्या निवासस्थानावर छापा टाकून अधिकाऱयांनी त्यांना धक्का दिला आहे. मरलिंगण्णवर यांच्याजवळ 1 किलो 135 ग्रॅम सोन्याची दागिने, 200 गॅम चांदी, एक निवासस्थान, 8 लाख 22 हजार रुपये रोख, 5 लाखाच्या गृहोपयोगी वस्तू अशी स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आली आहे. ही प्राथमिक माहिती असून आणखी घबाड आढळून येण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे रायबाग तालुक्यातील सहकार खात्याचे विकास अधिकारी ए. के. मास्ती यांच्याजवळही अनधिकृत मालमत्ता आढळून आल्याचे समजते. त्यांच्या बैलहोंगल शहरात 2 निवासस्थाने, 263 ग्रॅम सोने, 945 ग्रॅम चांदी, 4 भूखंड, 4 कार, 6 दुचाकी, दीड लाखांच्या ठेवी आणि शेअर्स आणि 5 लाखांच्या गृहोपयोगी वस्तू आढळल्या आहेत. त्यांच्या आणखी मालमत्तांचा शोध जारी असून याविषयी अधिक तपशिल दोन दिवसांत उपलब्ध होऊ शकेल.
गुलबर्गा जिल्हय़ाच्या जेवर्गीचे सार्वजनिक बांधकाम अभियंता एस. एम. बिरादार यांच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकून बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेण्यात आला आहे. त्यांच्याजवळ 54.50 लाख रु. रोख, 100 ग्रॅम सोने, 36 एकर शेतजमीन, 15 लाखांच्या गृहोपयोगी वस्तू, गुलबर्ग्यात दोन निवासस्थाने, बेंगळूरमध्ये 1 भूखंड, विविध कंपन्यांच्या तीन कार, 1 दुचाकी, 1 शालेय वाहन, 2 ट्रक्टर आढळून आले आहेत.
गदगमधील कृषी खात्याचे संचालक टी. एस. रुद्रेशप्पा यांच्यावरील छाप्यात 3.5 कोटी रुपये किंमतीचे 9 किलो 400 गॅम सोन्याची बिस्किटे व दागीने, 4 भूखंड 2 निवासस्थाने हिऱयांचा हार, 5 किलो चांदी, 15.94 लाख रुपये रोख, 8 एकर कृषी जमीन, 3 दुचाकी, 20 लाखांच्या गृहोपयोगी वस्तू अशी मालमत्ता आढळून आली आहे. बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील दोड्डबळ्ळापूर येथील महसूल निरीक्षक लक्ष्मीकांतय्या यांच्या बहुमजली इमारतीवरही एसीबीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला. त्यांच्याजवळ कोटय़वधी रुपयांची सोने-चांदी आढळून आले.
बेंगळूरमधील सकाल विभागाचे अधिकारी एल. सी. नागराज, यलहंका सरकारी रुग्णालयाचे फिजिओथेरपिस्ट राजशेखर, बेंगळूर महापालिकाचे प्रथमश्रेणी साहाय्यक मायण्णा, बेंगळूर महापालिकेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी जी. व्ही. गिरी यांचे बागलगुंटे येथील कार्यालय, निवासस्थानी, बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे, अशी माहिती एसीबीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सीमंतकुमार सिंग यांनी दिली.
मंगळूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता के. एस. लिंगेगौडा, मंडय़ातील कावेरी पाणीपुरवठा निगमचे हेमावती कालवा कार्यकारी अभियंता श्रीनिवास के. आणि बेंगळूर निर्मिती केंद्राचे निवृत्त प्रोजेक्ट मॅनेजर वासूदेव यांनाही एसीबीने दणका दिला आहे. जुलै 2021 मध्ये निवृत्त झालेले बळ्ळारी उपनोंदणी अधिकारी के. एस. शिवानंद यांच्याजवळही कोटय़वधीचे घबाड आढळून आले आहे.
गुलबर्ग्यात पाईपमध्ये लपविली नोटांची बंडले
गुलबर्ग्यामध्ये पीडब्ल्यूडीचे अभियंता शांतगौडा बिरादार यांचे निवासस्थान, कार्यालय आणि यड्रामी येथील फार्महाऊसवर एसीबीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला. यावेळी शांतगौडा यांच्या बंगल्यातील पाईपमध्ये नोटांची बंडले आढळून आली आहेत. अधिकाऱयांनी छापा टाकताच शांतगौडा आणि त्यांच्या कुटुंबीयांना नोटांची बंडले पाईपमध्ये लपविण्याचा प्रयत्न केला. तपासणीवेळी हा प्रकार उघडकीस आला. पाईपमध्येच सुमारे 5 लाख रुपयांहून अधिक रोकड आढळून आली आहे. त्यांच्या निवासस्थानातील छाप्यात मोठे घबाड आढळून आले आहेत. त्यांच्या बँक खात्याचा तपशिलही जमा केला जात आहे.
छापा पडलेले अधिकाराr
@ नाथाजी पाटील, गुप सी हेस्कॉम-बेळगाव
@ सदाशिव मरलिंगण्णवर, आरटीओ इन्स्पेक्टर-गोकाक
@ ए. के. मास्ती, विकास अधिकारी सहकार खाते-रायबाग
@ के. एस. लिंगेगौडा, कार्यकारी अभियंता-स्मार्ट सिटी मंगळूर
@ श्रीनिवास के., कार्यकारी अभियंता-एचएलबीसी मंडय़ा
@ लक्ष्मीकांतय्या, महसूल निरीक्षक-दोड्डबळ्ळापूर
@ वासूदेव, निवृत्त प्रोजेक्ट मॅनेजर निर्मिती केंद्र-बेंगळूर
@ बी. कृष्णरेड्डी, जनरल मॅनेजर-नंदिनी डेअरी बेंगळूर
@ टी. एस. रुद्रेशप्पा, संचालक-कृषी खाते गदग
@ के. एस. शिवानंद, निवृत्त उपनोंदणी अधिकारी-बळ्ळारी
@ राजशेखर, फिजिओथेरपिस्ट सरकारी रुग्णालय-यलहंका
@ मायण्णा एम. प्रथमश्रेणी साहाय्यक-बेंगळूर महापालिका
@ एल. सी. नागराज, सकाल प्रशासकीय अधिकारी-बेंगळूर
@ जी. व्ही. गिरी, चतुर्थश्रेणी कर्मचारी-बेंगळूर महापालिका
@ एस. एम. बिरादार, कनिष्ठ अभियंता-सार्व. बांधकाम खाते-जेवर्गी