-एकजण पोलिसांच्या जाळय़ात
प्रतिनिधी/ मंडणगड
तालुक्यात गुटख्याची अवैध वाहतूक करताना येथील पोलिसांनी गुरुवारी सकाळी 9च्या दरम्यान येथील एसटी बसस्थानकासमोरील चौकात सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा मॅक्झिमो गाडीही जप्त करण्यात आली आहे.
मंडणगड एसटीस्थानक परिसरात गुरुवारी सकाळी 9 च्या दरम्यान एसटी बसस्थानकासमोरील चौकात बेकायदेशीरपणे महिंद्रा मॅक्झिमो गाडी (एम.एच. 07, डब्ल्यू 2607) या चारचाकी वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करीत असताना कमलकांत सागरमल गोयल (41, रा. काळकाई कोंड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी) याला मंडणगड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे सुमारे 2 लाख 73 हजार रुपये इतक्या किंमतीचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी गोयल याच्यावर मंडणगड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273 ,188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या बाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल धनंजय शांताराम सावंत यांनी दिली. तसेच या गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा मॅक्झिमो गाडीही जप्त करण्यात आली. या बाबतचा अधिक तपास मंडणगडच्या पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.