प्रतिनिधी / मंडणगड
शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित ठेऊन प्रशासकीय कार्यालयाचे नूतनीकरण करणाऱया मंडणगड नगर पंचायतीच्या कार्यक्रमावर आमदार योगेश कदम यांनी बहिष्कार टाकला.
याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शहरातील जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. शहरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. अशाच इतर अनेक समस्या असताना नगरसेवकांनी वातानुकुलीत कार्यालयात बसणे योग्य नाही. कार्यालयावर 75 लाखांचा निधी खर्च करण्यापेक्षा आधी येथील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले असते तर ते अधिक चांगले झाले असते. सार्वजनिक निधीच्या चुकीच्या विनियोगाची बाब न पटल्याने आपण कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे कदम यांनी सांगितले.