थेट पाईप लाईन योजनेच्या हेडवर्क्सचे 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही : महानगर भाजपचा आरोप
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोणत्याही पाईपलाईन योजना कामात हेडवर्कचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुढील कामे करायची नाही, अशी शासनाची मार्गदर्शक तत्वे आहेत. मात्र थेट पाईप लाईन योजनेच्या कामात हेडवर्कचे काम 50 टक्केही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे योजना पूर्ण होण्यास किती काळ विलंब लागेल हे कुणीही सांगू शकत नाही. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ संपूर्ण योजनेतील 85 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगून कोल्हापूरवासियांशी शुद्ध दिशाभूल करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगर भाजपच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
भाजपचे प्रदेश सदस्य महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत थेट पाईप योजनेच्या अपुऱया कामविषयी माहिती देताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी अजित ठाणेकर यांनी तांत्रिक माहिती दिली. यावेळी सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, हेमंत आराध्ये, गणेश देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणेकर म्हणाले, थेट पाईप लाईन योजना वेळेत पूर्ण करू शकत नसल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली. त्यांच्या या कृतीतून 2016 पासून भाजपने जे सातत्याने आग्रही मुद्दे मांडले ते खरे असल्याचे स्पष्ट झाले. मुश्रीफ यांच्या प्रमाणे या योजनेचे श्रेय लाटू पाहणाऱया पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कोल्हापूरवासियांची माफी मागावी, अशी भाजपची मागणी आहे.
तांत्रिक माहिती देताना ठाणेकर म्हणाले, थेट पाईप लाईन योजनेच्या डीअीपारला 14 मार्च 2012 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली. 2ाdन7 डिसेंबर 2013 रोजी केंद्र सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. योजनेची मंजूर किंमत 425.41 कोटी होती. पण त्याची निविदा 15.48 टक्के आधिक्याने म्हणजेच 488.737 कोटी रकमेने काढण्यात आली. 22 ऑगस्ट 2014 रोजी वर्कऑर्डर देण्यात आली. त्यानंतर 27 महिने अर्थात 21 नोव्हेंबर 2016 पर्यंत कामाची मुदत दिली गेली. प्रत्यक्षात 2015 मध्ये कामाला सुरूवात झाली. 2016 नंतर योजनेस आतापर्यंत पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली. अशा स्थितीत योजनेतील महत्वाचे असणारे हेडवर्क्सचे काम 50 टक्केही पूर्ण झालेले नाही. हेडवर्क्सच्या कामात इनटेक वेल 2, इन्स्पेक्शन वेल 1 जॅकवेल 2, जॅकवेलवरील पंपहाऊस 1, ब्रेक पेशर टँक 1, या सर्वांना जोडणारी अंतर्गंत पाईप लाईन यांचा समावेश होतो. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय पाईप लाईन योजनेतून पाणी येऊ शकत नाही. योजनेच्या एकूण कामात हेडवर्क्सचे काम 30 ते 40 टक्के आहे. पण हेच काम अर्धेही (50 टक्के) पूर्ण झालेले नाही. मात्र मंत्री मुश्रीफ 85 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत आहेत. ही कोल्हापूरकरांची फसवणूक आहे, असे ठाणेकर यांनी सांगितले.
सूचना, दुरूस्त्यांकडे दुर्लक्ष
2016 पासून भाजपने थेट पाईप लाईन योजना कामातील त्रुटी वेळोवेळी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. सूचना केल्या, विरोधक असलो तरी विरोधाला विरोध म्हणून कधीही योजना काम बंद करण्याची मागणी केली नाही. पण पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेमुळे आम्ही केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असेही ठाणेकर यांनी सांगितले.