अखंडित वीज पुरवठय़ासाठी उपाययोजना करण्याची सूचना
प्रतिनिधी /फोंडा
शिरोडा मतदारसंघात वीजेच्या लंपडावामुळे ग्राहक व नागरिकांना होणाऱया गैरसोयीवर उपाय म्हणून सहकारमंत्री तथा स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर यांनी नुकतीच बैठक वीज खात्याच्या अधिकाऱयांशी घेतली. यावेळी वीज खात्याच्या अडचणी जाणून घेतल्या व अखंडीत वीज पुरविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
शिराडय़ातील चारही पंचायत क्षेत्रातील वीज अभियंत्यांशी तसेच वीज खात्याचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यंदा उकाडा असह्य़ होत असल्याने अखंडीत वीजेची मागणी सर्व नागरिकांकडून हाते असते. वीजेचा लंपडावाचे नेमके कारण शोधून उकाडय़ात नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन वीज खात्याला केले. तसेच वीज अभियंत्याच्या अडचणी जाणून घेतल्या. यावर तोडगा काढण्याविषयी आश्वासन दिले. भूमिगत वीज वाहिनीसाठी भविष्यात विचार व्हावा असे यावेळी सुचविण्यात आले.