प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील सर्व मंदिरांची आजपासुन भाविकांसाठी दारे उडण्यात येत आहेत. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी प्रवेश मिळणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच घटस्थापनेचे औचित्य साधुन मंदिरांमध्ये रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची साफसफाई आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षाहुन अधिक काळ धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. पण सध्या कोरोनाचा कहर ओसरत असल्याने सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यातच घटस्थापनेच्या पहिल्याच दिवसांपासुन मंदिरे सुरू होणार असल्याने, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कित्येक मंदिरांच्या कार्यकारणींनी भाविकांची गर्दी एकाच वेळी होऊ नये याकरीता विशेष खबरदारी ही घेतली आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील मंगळाई देवी मंदिर, पंचपाळी हौद येथील देवी, खोडजाई देवी मंदिर, मरीआई देवी मंदिर, अजिंक्यतारा गडावरील मंगळाई देवी आदी ठिकाणी दर्शनाकरीता भाविकांची आवर्जुन गर्दी होते. त्याचबरोबर जिल्हय़ातील तसेच जिल्हय़ाबाहेरील मंदिरांचे दर्शन घेण्यात येते. मागील वर्षी कोरोनाचा कहर अधिक प्रमाणात असल्याने भाविकांना दर्शन घेता आले नाही, पण यंदा मात्र आपल्या आराध्य दैवतेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.