प्रतिनिधी / कुर्डुवाडी
मकवान घेऊन जाणारा छोटा हत्ती कॅनोलपट्टीमध्ये पडून चालक पित्यासह मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माळेगाव मिटकलवाडी कॅनोलमध्ये दि.२४ रोजी सकाळी ९.३० वा सुमारास घडली. तात्यासाहेब बाळासाहेब कोळी-माने (चालक) वय २८ व आरती तात्यासाहेब कोळी-माने वय ७ दोघे रा.मिटकलवाडी हल्ली मानेगाव ता.माढा असे यातील मृतांची नावे आहेत.
याबाबत नागनाथ भिकाजी कोळी वय ४८ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तात्यासाहेब बाळासाहेब कोळी हा त्याचा छोटा हत्ती एम एच ४५ टी ०३१२ मध्ये मकवान भरून सोबत त्यांची मुलगी आरती तात्यासाहेब कोळी हिला घेऊन मालेगाव मिटकलवाडी कॅनोलपट्टीने भरधाव वेगात जात होते. या वेळी छोटा हत्ती चालवून रस्त्याची परिस्थिती न पहाता अविचाराने गाडी चालवून रोडच्या डाव्या साईडला असलेल्या कॅनोल पट्टीमध्ये पडून स्वतःच्या व मुलीच्या मरणास कारणीभूत ठरला आहे. म्हणून चालक मयत तात्यासाहेब कोळी याच्यावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो उपनिरीक्षक काशीद हे करीत आहेत.