वार्ताहर/ मडकई
येणाऱया निवडणुकीत राजकीय परिवर्तन निश्चितच होणार. मगो पक्षाला जनतेची सहानुभूती असून जनतेच्या पाठिंब्यावर गोव्यात नवीन सकाळ उजाडणार आहे. भाजपाच्या भ्रष्ट शासनाला व नितीहिन राजकारणाला जनता कंटाळली असून यापूर्वी काँग्रेसनेही हेच केले होते. भाजपा व कॉग्रेसला अद्दल घडवीण्यासाठी मगो पक्षाने तृणमूल कॉग्रेस पक्षाशी युती केली आहे, अशी ग्वाही मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली.
सुदिन ढवळीकर यांनी मडकई मतदार संघात शनिवारी प्रचाराचा फोडला. सकाळी बांदोडा येथील श्री महालक्ष्मी देवीचे आशिर्वाद घेतले. यावेळी पत्नी सौ. ज्योती ढवळीकर, युवा नेते मिथील ढवळीकर व मगो कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते. त्यानंतर मडकई येथील ग्रामदेवता श्री नवदुर्गा, श्री आमेकार व फर्मागुडीचे श्री कटमगाळ दादांच्या स्थानी श्रीफळ ठेवले. त्यानतंर फोंडा, दुर्भाट, आडपई आगापूर अशी रॅली काढण्यात आली. फर्मागुडी येथील जाहीर सभेत सुदिन ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले.
भाजपाचे अनेक कार्यकर्ते मगोच्या वाटेवर
तृणमुलशी युती केल्याने भाजपाने मगोवर टिका केला. या टिकेला उत्तर देताना ढवळीकर म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये 68 टक्के हिंदू असूनही तेथे 75 टक्के हिंदू आमदार निवडून आले. तृणमुलशी युती केल्याने मगो कार्यकर्ते पक्ष सोडतील असा खोटा प्रचार भाजपाने सुरु केला होता. पण परिस्थिती नेमकी उलटी झाली. येत्या पाच दिवसात गोव्यातील विविध मतदार संघातून भाजपाचे कित्येक कार्यकर्ते मगो पक्षात प्रवेश करणार आहेत. मगो व तृणमूल युतीने महिला व युवकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत, त्या प्रत्यक्षात येण्यासाठी किमान 22 उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. वेळप्रसंगी आपशी युती होऊ शकते पण कॉग्रेसशी नाही असे संकेतही त्यांनी दिले.
शशिकलाताईंचे प्रशासन सार्वेकृष्ट
निवृत न्यायाधीश रिबेलो यांनी हल्लीच एका वर्तमानपत्रात माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या प्रशासनाची स्तुती केली होती. आपण स्व. भाऊसाहेब बांदोडकरांपासून अनेक मुख्यमंत्री पाहिले. मगो पक्षाच्या नेत्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या प्रशासनाएवढे उत्कृष्ट शासन अन्य कुठलेच पाहिले नाही. न्या. रिबेलो यांचे हे उद्गार सूचक आहेत. मडकई मतदार संघातील जनतेने आपल्यावर अलोट प्रेम केले. प्रचाराला आपण स्वतः मडकई मतदार संघात येवू शकणार नाही. त्यामूळे आपल्या प्रचाराची धूरा बंधू दिलीप ढवळीकर, पुत्र मिथील ढवळीकर व कार्यकर्त्यांवर सोपविली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
सुदिन ढवळीकरांमुळेच मडकईचा विकास – कवळेकर
आमदार सुदिन ढवळीकर यांनी मडकई मतदार संघात कुठलाच विकास केलेला नाही, अशा टिका भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जाते. त्याला उत्तर देताना कवळेचे सरपंच राजेश कवळेकर म्हणाले, ढवळी, कवळे व बांदोडा येथील उड्डाणपूल, कवळे, दुर्भाट मलनिस्सारण प्रकल्प, उंडीर ते तिस्क व्हरड पूल, कुंडईचा बगल रस्ता असे कित्येक प्रकल्प आमदार सुदिन ढवळीकर यांनी राबविले. मोफत नोकऱया, माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे कित्येक युवतींच्या नर्सिंग कोर्ससाठी खर्च उचलला. बांदोडाचे सरपंच राजेश नाईक म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी जसे तानाजी मालुसरेंचे योगदान उल्लेखनीय ठरले, तसेच कार्य मगो पक्षासाठी मडकई मतदार संघाबरोबर इतर मतदार संघातही कार्यकर्त्यांनी करावे.
यावेळी व्यासपीठावर वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गावकर, दुर्भाटच्या सरपंच सरोज नाईक, मडकईच्या सरपंच लक्ष्मी वळवईकर, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, राजीव गांधी कलामंदिराचे माजी अध्यक्ष अजीत केरकर, मगो केंद्रीय समितीचे अनंत नाईक व नरेश गावडे हे उपस्थित होते. सुत्रसंचालन सलोनी गावडे यांनी केले.