संशयित मंगळूरचा : क्लिनिकमध्ये येऊन गळा पकडला
प्रतिनिधी /फोंडा
मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांच्यावर सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या तिस्क फोंडा येथील स्पार्क या क्लिनिकमध्ये हल्ला करण्यात आला. हेराल्ड माबेन (49, रा. मंगळूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या संशयिताचे नाव असून त्याने आपला गळा पकडल्याचे डॉ. भाटीकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. भाटीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना काल सोमवारी सकाळी 11.30 वा. सुमारास घडली. संशयित व्यक्ती आपल्या क्लिनिकमध्ये आली व आपण निवडणूक सर्वेसाठीसाठी आल्याचे सांगितले. प्रशांत किशोर यांच्यासाठी आपण काम करीत असल्याचेही त्याचे म्हणणे होते. आपला एक हात दुखत असल्याचे त्याने सांगितले व त्याचा हात पाहण्यासाठी आपण उठलो. आपण बेसावध असतानाच त्याने दुसऱया हाताने आपला गळा पकडला. प्रतिकार करण्यासाठी आपण हिसका दिला, तेव्हा आपल्या दातांना चार दिवसांपूर्वी घातलेले कॅप खाली पडले. क्लिनिकमधील कर्मचारी व काही कार्यकर्त्यांच्या साहाय्याने आपण त्याला पकडून बाहेर आणले व पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले.
आपला आवाज बंद करण्यासाठीच हा हल्ला : डॉ. भाटीकर
फोंडय़ात सध्या आपले जे समाजकार्य सुरु आहे, त्यामुळे काही हितशत्रूंनी आपल्याला भिती दाखविण्यासाठी या माणसाला पाठवला असावा. संशयिताची पोलिसांनी सखोल चौकशी करुन त्याला कुणी व का पाठविले ? हे उघड झाले पाहिजे. राज्यात सध्या गुन्हे वाढत आहेत. कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवर दिवसाढवळय़ा हल्ले होऊ लागले आहेत. संशयिताने आपला गळाच पकडला. एखादे हत्त्यार गळय़ावर चालविले असते, तर आपल्या जीवावर बेतले असते, असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच तपास होईल : निरीक्षक मोहन गावडे
फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी संशयित हेराल्ड माबेन हा मंगळूर येथील असल्याचे सांगितले. सात दिवसांपासून तो फोंडय़ातील किर्ती हॉटेलमध्ये राहायला होता. वरचा बाजार येथील नक्टेश्वर हॉलजवळ त्यांने राहायला भाडय़ाची खोलीही घेतली होती. त्याला संगणकाचे बरेच ज्ञान आहे. तो डॉ. भाटीकरकडे कशासाठी गेला होता हे स्पष्ट झालेले नाही. शिवाय आपण गळा पकडल्याचे तो नाकारतो. डॉ. भाटीकर यांच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले असून ते मिळाल्यानंतर या प्रकरणी सविस्तर तपास होईल.