क्षुल्लक कारणावरून घडली घटना
प्रतिनिधी /बेळगाव
क्षुल्लक कारणावरून आनंद गल्ली-मच्छे येथील दोघा भावंडांवर चाकूहल्ला करण्यात आला. सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास स्वामीनगर येथे ही घटना घडली असून जखमी भावंडांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अक्षय पालेकर (वय 27), अभिषेक पालेकर (वय 23, दोघेही रा. आनंद गल्ली, मच्छे) अशी जखमींची नावे आहेत. अक्षयवर उपचार करून घरी जाऊ देण्यात आले आहे तर अभिषेकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उपलब्ध माहितीनुसार अक्षय हा व्हीटीयूमध्ये नोकरी करतो. दुपारी दुचाकीवरून तो जेवणासाठी घरी जात होता. त्यावेळी स्वामीनगरनजीक पाठीमागून एका दुचाकीची त्याला धडक बसली. वादावादीनंतर अनगोळ येथील मतीन या तरुणाने अक्षयवर चाकूने हल्ला केला.
जखमी अक्षयने आपला भाऊ अभिषेकला बोलावून घेतले. मतीनने त्याच्यावरही हल्ला केला. यावेळी मतीनसोबत मजगाव येथील अनिलनामक आणखी एक तरुण होता. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.