वार्ताहर / किणये
मच्छे ग्राम पंचायतीमध्ये तत्कालीन पीडीओ व ग्राम पंचायत कर्मचारी यांनी 15 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याची तक्रार ग्राम पंचायत माजी सदस्य संतोष जैनोजी व इतर माजी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या ग्रामसभेमध्ये केली.
मंगळवारी सकाळी मच्छे ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेला नोडल अधिकारी म्हणून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यु. एस. शिगीहळ्ळी होते. पंचायतीमध्ये काही रक्कम खर्च दाखविण्यात आली आहे. मात्र, खर्च करून आणलेले साहित्य कोठे आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी ग्राम पंचायत माजी सदस्यांनी केली असल्याने ही ग्रामसभा रंगली.
ग्रामसभेसाठी सध्याचे पीडीओ अरुणकुमार नायक, तालुका पंचायत सदस्या भीमराव दंडगल उपस्थित होते. 14 व्या वित्त आयोग योजनेतून विद्युत पुरवठा करण्यासाठी व पाईपलाईनसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. दोघा कामगारांच्या नावावरही परस्पर रक्कम काढून घेण्यात आली आहे. याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा, असे संतोष जैनोजी यांनी सांगितले.
या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱयांना कळविण्यात येणार असल्याचे अधिकारी यु. एस. शिगीहळ्ळी यांनी उपस्थित ग्राम पंचायत माजी सदस्यांना सांगितले.
ग्रामसभेत पाणी समस्या, स्वच्छता, रोजगार हमी योजना याबाबतही चर्चा करण्यात आली. या सभेला ग्राम पंचायत माजी सदस्य महादेव मंगणाकर, रमेश कऱयाण्णावर, गणपत जाधव, सचिन बेळगावकर, ग्राम पंचात माजी अध्यक्षा पद्मश्री हुडदे, माजी उपाध्ययक्ष असद हुजदार, माजी सदस्या मीना लोहार, कस्तुरी कोलकार व इतर माजी सदस्य व सदस्या उपस्थित होते.