पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
मटका, जुगारी अड्डय़ांवरील कारवाईच्या सपाटय़ानंतर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी रायण्णानगर-मजगाव येथील एका मटकाबुकीला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश बजावला आहे. या आदेशाने मटकाबुकींत खळबळ माजली आहे.
विशेष कार्यकारी दंडाधिकारीही असणारे डॉ. विक्रम आमटे यांनी हा आदेश बजावला असून 17 जूनपासून 16 डिसेंबर 2021 पर्यंत अब्दुलमुनाफ मैनुद्दीन तिगडी (वय 67, रा. रायण्णानगर-मजगाव) याला हावेरी जिह्यात तडीपार केल्याचा आदेश बजावला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील नागरिकांचे हित लक्षात घेवून हा निर्णय घेतल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. मजगाव व उद्यमबाग परिसरातील गरीब, मध्यमवर्गीय व कामगारवर्गाला मटका खेळण्यासाठी अब्दुलमुनाफ प्रवृत्त करत होता. झटपट पैसे कमविण्याचा हा मार्ग आहे. काम न करता घर बसल्या तुम्हीही पैसे कमवा, असे सांगत तो कामगारांना मटक्मयाकडे वळवत होता.
2011 पासून आतापर्यंत अब्दुलमुनाफवर 11 गुन्हे दाखल झाले असून या सर्व गुह्यांत त्याला शिक्षा झाली आहे. त्यानंतरही त्याने मटकाबुकीचे काम सुरूच ठेवले होते. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे अब्दुलमुनाफला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असून लवकरच आणखी काही मटका व जुगारी अड्डे चालकांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.