प्रतिनिधी / कोल्हापूर
मटकाबुकी सम्राट कोराणे याने मटक्याच्या धंद्यातून जी बेहिशोबी मालमत्ता मिळविली आहे. त्या मालमत्तेची याच्यावर सक्त वसुली संचनालय (ईडी) मार्फत स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे. त्याची कोल्हापूर जिह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा राज्यात सुमारे दीडशे ते दोनशे कोटींची बेनामी मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, शहरातील यादवनगरामधील मटकाबुकी सलीम मुल्लाच्या टोळीवर मोकातंर्गत कारवाई करीत, या टोळीतील 42 जणाच्या मुसक्या आवळण्यास यश आले. तर बोरिवली (मुंबई) येथील पप्पू सावला व शहरातील वेताळ पेठ येथील मटकाबुकी सम्राट कोराणे हे दोघे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण या दोघाचा ठावठिकाणा मिळून येईना. याबाबतची माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने या दोघांना फरारी घोषित करण्यात आले आहे. तसेच जिह्यातील खासगी सावकारी व गांजा सारख्या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱया टोळ्यावर विशेष लक्ष देण्यात आले असून, खासगी सावकारी व अंमली पदार्थ तस्करांचे समुळ उच्चाटन करण्यात येणार आहे. फरारी कोराणे विषयी आतापर्यत सुमारे 200 जणाकडे चौकशी करण्यात आली. त्यातील कोराणेचा ताराबाई पार्कमध्ये मटका घेणाऱया तिघांकडूनही बरीच माहिती उपलब्ध झाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.