कोची मतदारसंघातील मट्टानचेरी हा भाग शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर बेटावर वसलेला आहे. 20 हजारांपेक्षा अधिक लोक येथे राहतात, पण हा भाग येथे मिनी इंडिया नावाने प्रसिद्ध आहे. या वसाहतीत काश्मिरी, गुजराती, तमिळ, तेलगू, आसामी, मणुपरी, कन्नड, मराठी, हिंदी, बंगाली, कोकणी, मल्याळम, ज्यू, खिश्चम, उर्दू, अँग्लो इंडियनसमवेत 18 भाषा जाणणारे लोक एकत्र राहताना दिसून येतात. कोची ज्यूंना देशातील सर्वात जुना ज्यू गट मानण्यात येते. त्या समुदायाचे देशात आता केवळ 26 ज्यू शिल्लक राहिले आहेत. यातील दोन येथेच राहतात. देशात ज्यू सर्वप्रथम मट्टानचेरी येथेच दाखल झाले होते.
विविध भाषांप्रमाणेच मट्टानचेरीमध्ये विविध पक्षांचे समर्थकही आहेत. तेथील प्रत्येक गल्ली, चौकात वेगवेगळय़ा पक्षांचे झेंडे फडकताना दिसून येतात. येथील गल्ल्यांना समुदायाच्या लोकांच्या नावाने ओळखले जाते.
मट्टानचेरीच्या प्रत्येक गल्लीत वेगवेगण्य़ा धर्मांशी संबंधित मंदिरे, चर्च, मशिदी दिसून येतात. येथे कोचीतील सर्वात मोठे तिरुमाला मंदिर आणि सर्वात जुने चर्च आणि मशिदही आहे. गुजराती आणि जैन समुदायाचीही मंदिरे आहेत. ज्यूंचे प्रार्थनास्थळ तसेच डचांचे चर्चही आहे.
कोची मतदारसंघ 2011 मध्ये आकारास आला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. तर 2016 च्या निवडणुकीत माकपचे के.जे. मॅक्सी विजयी झाले. कोचीत 1.77 लाख मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. यंदा माकपच्या वतीने मॅक्सी, काँग्रेसकडून टोनी चाम्मानी आणि भाजपचे सी.जी. राजागोपाल उमेदवार आहेत. या मतदारसंघात सुमारे 40 टक्के ख्रिश्चन मतदार असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरते.