प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी काल सोमवारी एकूण 35 जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. त्यात प्रामुख्याने गोवा फॉरवर्ड, काँग्रेस समर्थक तसेच भाजप पुरस्कृत वायंब्रट मडगाव पॅनलच्या उमेदवारांचा समावेश होता. अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मडगाव नगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे संकेत आत्ताच मिळू लागले आहेत.
काल सोमवारचा मुहूर्त साधून गोवा फॉरवर्ड, काँग्रेस समर्थक तसेच वायंब्रट मडगाव पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या समर्थकांसह उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन निर्वाचन अधिकाऱयांकडे अर्ज सादर केले. गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी फातोर्डा येथील श्री दामोदर (लिंग) देवस्थानाला भेट देऊन श्रींचे आशीर्वाद घेतले व नंतर उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, माजी नगराध्यक्षा पूजा नाईक तसेच इतर उपस्थितीत होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, मडगाव व फातोर्डा भागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यावी. गेल्या वेळी आपल्या उमेदवारांना मतदारांनी साथ दिली होती. तशीच साथ यावेळी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले उमेदवार पूर्वी प्रमाणेच एकसंघ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वायंब्रट मडगावच्या पॅनलमधील उमेदवारांनी अर्ज सादर करताना मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे तसेच इतर पदाधिकारी उपस्थितीत होते. वायंब्रट मडगावच्या पॅनलमधील उमेदवार मिलाग्रीना गोम्स यांनी प्रभाग 7 मधून आपला उमेदवार अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे कार्यकर्ते दिलीप नाईक, अनिल रहेजा, ग्रेग डायस, ज्योईल बार्बोझा, सुनील नाईक, भारती नाईक, जीवन नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते. याच पॅनलच्या प्रभाग 13 मधील उमेदवार डॉ. सुशांता कुरतरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकाऱयांना सादर केला. यावेळी माजी नरसेवक केतन कुरतरकर व इतर कार्यकर्ते व समर्थक उपस्थितीत होते.
पत्रकार प्रतिक परब यांनी हाऊसिंगबोर्ड प्रभाग 24 मधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. हा प्रभाग विकसीत करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रभागात आपण गेली 30 वर्षे राहत असून या प्रभागातील समस्या कोणत्या आहेत याची आपल्याला कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.