कृत्यानंतर प्रियकराकडून आत्महत्येचा प्रयत्न
प्रतिनिधी /मडगाव
प्रेमप्रकरणातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना सोमवारी मडगावात घडली. या युवकाने नंतर आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेत जखमी झालेली युवती डिचोली तालुक्यातील आहे. आरोपीचे नाव परशुराम गवस (21) असे असून हा आरोपी मूळ देऊळवाडी-आंबडगाव, दोडामार्ग तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मडगावात ज्या जागी ही घटना घडली तो परिसर फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हद्दित येतो. फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली.
पीडित युवती मडगावच्या जिल्हा इस्पितळात एक्स रे टेक्निशियन म्हणून सेवेत आहे. आरोपी व सदर युवती डिचोली परिसरात राहतात. लहानपणापासून त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचा दावा संशयित आरोपीने केलेला असला तरी मुलींच्या घरच्याकडून त्यांच्या लग्नाला विरोध असल्याचे समजते.
आरोपी डिचोली येथील एका कुरियर कंपनीत काम करीत आहे. सोमवारी आरोपीने तिला मडगावात गाठून सुऱयाने भोसकले आणि त्याच सुऱयाने वार करुन आपणही आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भोसकण्याची ही प्रक्रिया चालू असताना एका पोलीस कर्मचाऱयाने ही घटना पाहिली आणि त्याने घटनास्थळी येऊन आणि प्रसंगावधान पाहून आरोपीच्या हातातून सुरा खेचून घेतला. अन्यथा आरोपीने या युवतीवर आणखी वार केले असते.
याच पोलीस कर्मचाऱयाने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही सरकारी इस्पितळात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. युवतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास चालू आहे.