प्रतिनिधी /मडगाव :
मडगाव येथील घाऊक मासळी मार्केट चांगल्या दर्जाचे बनविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून त्यानुसार या घाऊक मासळी मार्केटचा जीआयसीडीने आराखडा तयार केलेला आहे. त्यामुळे या मासळी मार्केटचे काम लवकारात लवकर सुरु करण्यात यावे यासाठी काल गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मार्केटला भेट देऊन पाहणी केली. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी मडगावच्या एसजीपीडी मार्केटातील किरकोळ मासळी विक्री मार्केटला भेट देऊन पाहणी केली.
गोमंतकीय जनतेचे मासे हे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे घाऊक व किरकोळ या दोन्ही मासळी मार्केटात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केले. गोव्यातील ‘रापणकार’ यांना मडगावच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये मासे विकण्यासाठी जागा मिळत नव्हता,r त्यामुळे किरकोळ मासळी मार्केटमध्ये त्यांना मासे विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल. कारण घाऊक मासळी मार्केट सकाळी 9 वाजल्यानंतर बंद केले जाईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेवर, मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रॉड्रिक्स, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, नुवेचे आमदार विल्प्रेड डिसा, माजी उपमुख्यमंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व इतर उपस्थित होते.
घाऊक मासळी मार्केट सुसज्ज असेल
गेल्या अनेक वर्षापासून ज्या सुविधा इथे उपलब्ध केल्या नव्हत्या त्या सुविधा आता उपलब्ध केल्या जाईल. तसेच या मासळी मार्केटच्या कामास प्रथम प्राधान्य दिले जाईल. इतर राज्यातूनही मडगावच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये मासे येत असून त्यामुळे माशांची तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील ज्या मासे विक्रेत्यांना मासे विकण्यासाठी जागेची कमतरता भासत होती, त्यांच्यासाठी सुद्धा किरकोळ मासळी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे कुणीही रस्त्याच्या बाजूला बसून मासळी व भाजी विक्री करू नये, तसेच कोणत्याही विक्रेत्यांनी आपला व्यापार रस्त्याच्या बाजूला बसून त्याची विक्री करु नय असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
भाजीपाला, फळे तसेच इतर वस्तू घेऊन रस्त्याच्या बाजूला बसून आपला व्यवसाय करणाऱया विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. या विक्रेत्यांना मार्केटमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यास तयार आहोत, तेव्हा अशा विक्रेत्यांवर आज पासून कारवाई करुन रस्त्याच्या बाजूला बसायला दिले जाणार नाही असा इशारा मडगाव नगरपालिका व मडगावच्या पोलीसांना दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
2020 मध्ये विकासाच्या दृष्टीने काम करेन
आमचे सरकार 2020 मध्ये विकासाच्या दृष्टीने चांगली कामगिरी करुन दाखविल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यातील युवकांना बेरोजगारी पासून मुक्त करण्याकरिता मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विचार करतील. खनिज व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठीही आम्ही प्रयत्नरत आहोत. गोव्याला प्लास्टिकमुक्त करण्याचाही आमचा संकल्प आहे.
विरोधी पक्षात फक्त पाच आमदार शिल्लक राहिले आहेत. तेव्हा त्यांनी आंदोलनाची भाषा बोलू नये. जेव्हा ते कोणत्याही विषयावर आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर येतात, तेव्हा त्यांचा फक्त एकच आमदार आंदोलनात भाग घेताना दिसतो. संपूर्ण गोव्याचा विकास हेच आमचे ध्येय असून आणि यासाठी आमचे सरकार कार्य करत आहे. विरोधी पक्षाकडे चांगले कार्य करण्याची क्षमता नसून तेव्हा त्यांना जे काही बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्या असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात गोव्यातील जनतेला काही राजकीय पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा, राज्यातील जनतेने नागरिकत्व कायदा व पोर्तुगीज पासपोर्ट संदर्भात चुकीची माहिती देणाऱया व्यक्तीकडे लक्ष देऊ नये. आज नागरिकत्व कायद्याला पाठींबा दर्शवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत राज्यातील जनतेने मोठय़ा प्रमाणात उपस्थित रहावे. यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती मिळेल असे मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.