प्लास्टिक आवरणांच्या खरेदीसाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
प्रतिनिधी / मडगाव
राज्यात सध्या कर्फ्यू लागू असून सकाळच्या सत्रात फक्त जीवनाश्यक वस्तूंची विक्री करण्यास सूट असली, तरी मडगावात सोमवारी सकाळी प्लास्टिक आवरणांची विक्री करणाऱयांनी बेकायदा दुकाने थाटली व येथे खरेदीसाठी गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मडगाव पोलीस व पालिका अधिकाऱयांनी या बेकायदा दुकानांवर कारवाई न केल्याने पोलीस व पालिका मडगावात कोविड संसर्ग फोफावण्यास हातभार लावत असल्याची टीका मडगाववासियांकडून होत आहे.
राज्यात सध्या कोविड संसर्ग वाढला असल्याने दोन आठवडे सरकारने कर्फ्यू लागू केला आहे. यासंदर्भात एसओपी निश्चित करण्यात आली आहे व नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. मडगाव सोमवारी रोपा आळ परिसरात प्लास्टिक आवरणांची विक्री करणारी कित्येक बेकायदा दुकाने पदपथावर थाटली गेली होती. मात्र पोलीस व पालिकेकडून कारवाई होत असल्याचे दिसून आले नाही.
रोपा आळ येथे प्लास्टिक आवरण व अन्य साहित्य विकणारी सात-आठ बेकायदा दुकाने थाटली होती, तर लीली गार्मेंटसमोर तसेच मागील बाजूला दुकाने थाटून अशाच प्रकारे प्लास्टिक साहित्याची विक्री करण्यात येत असल्याचे दिसून आले. रोपा आळ येथे दोन पोलीस उपस्थित होते, एकाकडे तर मशिनगन होती. हे पोलीस या बेकायदा विपेत्यांना वारंवार दुकाने बंद करण्यास सांगत असल्याचे आढळून आले. मात्र त्यांचा कोणताही धाक या बेकायदा विपेत्यांवर दिसून आला नाही. हे दोघे पोलीस स्थानकाशी संपर्क साधून अतिरिक्त पोलीस पाठविण्यास सांगत असल्याचे दिसून येत होते. मात्र येथे आणखी पोलीस आलेच नाहीत. त्यामुळे हा बेकायदा बाजार बिनधास्तपणे चालू होता. पालिकेच्या दोन कामगारांनी येऊन या विपेत्यांना हटविण्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले.
फातोर्डा पोलीस निरीक्षकांकडून धडा घेण्याची गरज
फातोर्डात असे प्रकार घडताना दिसत नाहीत. तेथील पोलीस निरीक्षक कपिल नायक स्वतः रस्त्यावर उतरून एसओपीचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करताना आढळतात व त्यांचे समाजमाध्यमांतून कौतुक होत आहे. तर फातोर्डाला भिडून असलेल्या मडगाव पोलीस हद्दीत मात्र अशी कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही. मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी कपिल नायक यांच्यापासून धडा घेऊन मडगावातही धडक कारवाई करताना सोशल डिस्टन्सिंग व एसओपीचे उल्लंघन होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज मडगाववासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.