प्रतिनिधी /फोंडा
दक्षिण गोव्यातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटीला 2019-20 सालचा उत्कृष्ट पतसंस्थेसाठी ठेवण्यात आलेला प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाला. फोंडा येथील राजीव कला मंदिरमध्ये या बक्षीस वितरण सोहळय़ाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते चेअरमन बाबाजी सावंत आणि संचालक डॉ. गुणाजी देसाई यांनी हा पुरस्कार व मानचिन्ह स्वीकारले.
यावेळी सहकार खात्याचे मंत्री गोविंद गावडे, सहकार खात्याचे सचिव चोखाराम गर्ग, फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, निबंधक अरविंद खुटकर तसेच किसन फडते यावेळी उपस्थित होते. मागील 41 वर्षे मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटीने दक्षिण गोव्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना चांगली सेवा दिली असून सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही चांगले कार्य केले आहे.
केवळ 36 भागधारकांना घेऊन सुरूवात केलेल्या या पतसंस्थेने विश्वास पात्र करीत आतापर्यंत 2000 भागधारकापर्यंत मजल मारली आहे. मागील 30 वर्षांपासून या पतसंस्थेला ऑडिटचा ‘अ‘ दर्जा मिळत आहे. पतसंस्थेने घेतलेल्या भरारीसाठी गेली कित्येक वर्षे निस्वार्थीपणे काम केलेले संचालक मंडळ, पतसंस्थेचे भागधारक आणि कर्मचाऱयांचाही वाटा मोलाचा असल्याचे यावेळी चेअरमन बाबाजी सावंत म्हणाले. हा सहकार प्रोत्साहन पुरस्कार आमच्या पतसंस्थेच्या भागधारकांचा आहे. भविष्यातही आपल्या भागधारकांना चांगली सुविधा देण्याचे आश्वासन चेअरमन सावंत यांनी दिले.