वार्ताहर / हिंडलगा
शनिवारी रात्री सोसाटय़ाच्या वाऱयासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मण्णूर येथील सरकारी कन्नड शाळेवरील दोन वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये शाळेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. तर शनिवारी मुसळधार पावसाबरोबरच दाखल झालेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. तसेच मण्णूरमधील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेतील दोन वर्गखोल्यांचे पत्रे पूर्णतः उडून गेल्याने बरेच नुकसान झाले आहे.
वर्ग खोल्यांमध्ये गळती असल्याने सहा महिन्यापूर्वीच सदर पत्रे बसविण्यात आले होते. पण संबंधित कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी घेऊन पत्रे बसविले नसल्याने हा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी शाळेवरील पत्रे उडून गेल्याची माहिती समजताच मुख्याध्यापक एच. एस. बजंत्री, एसडीएमसी अध्यक्ष बसवंत नाईक, यल्लाप्पा नाईक, सुधीर काकतकर, यल्लाप्पा ब. नाईक आदींनी पाहणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱयांनी त्वरित पाहणी करून दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आहे.