तरुण भारत संवाद
पंढरपूर / प्रतिनिधी
तालुक्यातील नांदोरे याठिकाणी मतिमंद अल्पवयीन मुलींवर दुष्कर्म झाले होते. या प्रकरणी आरोपीस येथील न्यायालयाने तिहेरी जन्मठेप आणि 16 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदरचा निकाल हा येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी सुनावला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, पंढरपूर तालुक्यातील नांदोरे याठिकाणी 30 सप्टेंबर 2016 मध्ये अल्पवयीन मुलीवर नारायण भानुदास कदम या 58 वर्षीय इसमाने दुष्कर्म केले होते. त्यावेळी पिडीतेच्या आजीने ते पाहिले आणि याबाबत करकंब पोलिस ठाण्यात कदम याच्याविरूध्द फ्ढिर्याद दिली होती. त्यावेळी तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला होता. विशेष म्हणजे घडल्या घटनेनंतर तात्काळ 24 तासातच आरोपीस गजाआड करण्यात पोलिस यशस्वी झाले होते.
या घटनेतील पिडीत ही दलित समाजाची होती. त्यामुळे तत्कालीन स्थितीमधे अनेक संघटना या प्रकरणावरून आक्रमक होऊन आरोपीस कठोर शिक्षेच्या मागणीसाठी एकवटल्या होत्या. यानंतर या संपूर्ण घटनेचा यथायोग्य तपास करून सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयापुढे हजर केले होते. यानुसार न्यायालयात एकूण 12 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यामधे प्रामुख्याने फ्ढिर्यादीच मुख्य साक्षीदार होते.
या घटनेमधे आरोपी हा संपूर्णतः न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आरोपीला आजपर्यत जामिन मिळाला नाही. पोलिसांचा तपास तसेच भक्कम साक्षीदारांच्या आधारावर नारायण कदम यांनेच मतिमंद मुलींवर बलात्कार केल्याचे सिध्द झाले.
या घटनेमध्ये न्यायालयाने भादवि 376 करिंता आजन्म कारावास तथा जन्मठेप आणि 5 हजार रूपये दंड, अनुसुचित जाती-जमाति कायद्यानुसार आजन्म कारावास तथा जन्मठेप आणि 5 हजार दंड, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार आजन्म कारावास तथा जन्मठेप आणि पाच हजार दंड आणि इतर कायद्यानुसार पाच वर्षे कारावास आणि 1 हजार दंड अशी एकंदर तिहेरी जन्मठेप आणि 16 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदरच्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ऍड. सारंग वांगीकर यांनी काम पाहीले. तर कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस फ्ढाwजदार संजय मंगेडकर यांनी काम पाहीले.