प्रतिनिधी/ सातारा
डबेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालकाने चारचाकी वाहनाला धडक देवून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, हे महाशय एवढे तट्ट होवून दुचाकी चालवत होते की त्यांनी अनेक वाहनांना टार्गेट केले असता मात्र, सुदैवाने इतर कोणतेही त्यांच्यासमोर आले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, समीर किसन जाधव (वय 31, रा. दरे तर्फ परळी, ता. सातारा) हा रविवारी सकाळी 10. 30 वा. सुमारास डबेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून जात होता. त्याच अवस्थेत दुचाकी चालवत असताना त्याने चारचाकी वाहन क्र. (एम. एच. 43 एएल 4422) ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाला. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती खासगी रुग्णवाहिका चालकाला दिल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णावाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सातारा-परळी मार्गावर वाहनांसह स्थानिक नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असते. स्थानिक नागरिक याच रस्त्याच्या कडेवरून शेतामध्ये ये-जा करीत असतात. सुदैवाने अपघात घडला तेव्हा रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे दैव बलवत्तर म्हणूनच ते वाचले. मात्र, मद्यधुंद चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.