प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन काळात चर्चेचा विषय ठरलेली दारुची दुकाने आता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुली राहणार आहेत. उत्पादन शुल्क विभागाने केंद्राच्या आणि कर्नाटक राज्याच्या सुधारीत संचारबंदीच्या वेळेच्या अनुषंगाने ही परवानगी दिली आहे. यापूर्वी सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातील दारुची दुकाने बंद ठेवावी लागली होती. 4 मे पासून मात्र या दुकानांची वेळ बदलण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये जवळजवळ दीड ते दोन महिने ही दुकाने बंद झाल्याने मद्य शौकिनांची गैरसोय झाली. जेंव्हा सरकारने ही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली तेंव्हा एकच गर्दी होऊन माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागली. आता मात्र रात्री 9 पर्यंत ही वेळ वाढविण्यात आली आहे. मद्यपानाची दुकाने बंद झाल्याने महसुलही कमी झाला. सरकारला खूप उशिरा याची जाणीव झाली. त्यामुळे सरकारने दारुची दुकाने 7 पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला. आता सर्व व्यवहार रात्री 9 पर्यंत सुरू राहणार असल्याने दारुच्या दुकानांनासुध्दा परवानगी देण्यात आली आहे.