मृतांमध्ये एका बालकासह 20 महिला, 25 पुरुषांचा समावेश
ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशच्या सिधी येथील बस दुर्घटनेत 46 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका बालकासह 20 महिला आणि 25 पुरुषांचा समावेश आहे. बस चालकासह 8 जण पोहत बाहेर आल्याने ते बचावले असून, बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सिधीहून सतनाच्या दिशेने निघालेली प्रवासी बस चालकाच्या चुकीने आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 30 फूट खोल कालव्यात कोसळली. या बसमधून 54 प्रवाशी प्रवास करत होते. बस 20 ते 22 फूट पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. मात्र, 7 प्रवाशी कसेबसे पाण्याबाहेर आले होते. त्यानंतर काही वेळातच बसचालकही पोहत बाहेर आला. घटनास्थळी बचवकार्याला वेग आला होता. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने बस पाण्यातून बाहेर काढून मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.