महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठय़ा संख्येने लिलाव प्रक्रिया : येत्या 1 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने 15 दिवस : 12 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर
प्रतिनिधी / बेळगाव
खंजर गल्ली येथील गाळय़ांचा वाद न्यायालयात असल्याचे कारण पुढे करून गाळे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र, या 39 गाळय़ांसह शहर व उपनगरांतील मनपाच्या मालकीचे 154 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कसाईखाना व बकरी शेडचा पुन्हा लिलाव करण्यात येणार आहे. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच 154 गाळय़ांकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्याकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, काही अडचणींमुळे व भाडे जास्त असल्याने गाळय़ांना बोली लागली नाही. त्यामुळे या गाळय़ांसह आणखी काही ठिकाणचे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्याकरिता दि. 1 जानेवारीपासून लिलाव प्रक्रिया आयोजिण्यात आली आहे.
कसाई गल्लीतील कसाई खान्यासह फिश मार्केटमधील सात गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. खंजर गल्ली परिसरातील लक्ष्मी मार्केटमधील 39 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण न्यायालयात वाद सुरू असल्याचे सांगून आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र, कायदा विभागाकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केपीटीसीएल कार्यालयाशेजारी स्मार्ट रोडवरील 14 गाळे नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजिण्यात आली आहे. 154 गाळय़ांसाठी टप्प्याटप्प्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून ती पंधरा दिवस चालणार आहे. सदर गाळे 12 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
दि. 1 जानेवारीपासून लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार असून सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात तसेच काही गाळय़ांच्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया चालणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.