प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या मोबाईलचे युग असल्याने तातडीने संपर्क साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहेच. महापालिकेच्या प्रत्येक अधिकाऱयांकडे मोबाईल आहे. मात्र महापालिकेत काम करणाऱया कर्मचाऱयांना एकाचवेळी सर्वांना माहिती पुरविण्यासाठी प्रत्येकाला फोन करावा लागतो. त्यामुळे यावर पर्याय म्हणून महानगरपालिकेने वॉकीटॉकी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या अधिकाऱयांच्या हाती मोबाईलसोबत वॉकीटॉकीदेखील दिसणार आहे.
महापालिकेचा कारभार सुरळीत होण्यासाठी तसेच अधिकाऱयांना संपर्क साधण्याकरिता यापूर्वी वॉकीटॉकीचा वापर केला जात होता. स्वच्छता विभागासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, मोबईलचा वापर सुरू झाल्यानंतर महापालिकेची वॉकीटॉकी यंत्रणा मोडकळीस आली. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्याने त्याद्वारेच संपर्क साधून सूचना करण्यात येत असतात. प्रत्येक विभाग प्रमुखाला माहिती दिल्यानंतर सर्व अधिकाऱयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर माहिती दिली जाते. आवश्यक आदेश, तक्रारीचे निरसन करण्याची सूचना व्हॉट्सऍपद्वारे कळविण्यात येत असतात. काहीवेळा नेटवर्क समस्या किंवा मोबाईल नादुरुस्त असल्यास अधिकाऱयांना सूचना मिळत नाहीत, अशा समस्या उद्भवतात. तसेच कोणतीही माहिती देण्यासाठी प्रत्येकाला मोबाईलवर संपर्क साधावा लागतो. त्यामुळे महापालिकेने वॉकीटॉकी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
वॉकीटॉकीमुळे सर्व अधिकारी सतर्क राहू शकतात. एखादा मेसेज सर्व अधिकाऱयांना एकाचवेळी देता येऊ शकतो. तसेच ही यंत्रणा 24 तास सुरू असल्याने कोणत्याहीवेळी सर्व अधिकाऱयांना शहरातील घडामोडींची माहिती मिळू शकते. पूरपरिस्थिती असो किंवा कोणत्याही अडचणीवेळी या यंत्रणेचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे वॉकीटॉकी सुविधा वापरण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तसेच स्वच्छता निरीक्षक, महसूल निरीक्षकांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. प्रमुख अधिकाऱयांना संपर्क साधण्यासाठी किंवा कोणतीही माहिती पोहोचविण्यासाठी वॉकीटॉकीचा उपयोग चांगला होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 50 वॉकीटॉकी खरेदी करण्यात आल्या असून महापालिका कार्यालय, लक्ष्मीटेकडी व आणखी एका ठिकाणी वॉकीटॉकीचे टॉवर बसविण्यात येणार आहेत. संपूर्ण शहरात वॉकीटॉकीद्वारे अधिकाऱयांना संपर्क साधता येणार आहे.
पुढील आठवडय़ापासून ही यंत्रणा कार्यान्वित होणार
सध्या पोलीस प्रशासन वॉकीटॉकीचा वापर करीत आहे. महापालिकेच्या सर्व अधिकाऱयांना संपर्क साधण्याच्यादृष्टीने आणि सतर्क राहण्याच्यादृष्टीने वॉकीटॉकी यंत्रणा आवश्यक असल्याने या यंत्रणेचा वापर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ापासून ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.