385 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, सोमवारी कळणार 58 नगरसेवक कोण?
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीत 58 वॉर्डांमधून 385 उमेदवार रिंगणात आहेत. याकरिता शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडल्याने सर्वांचे भवितव्य इव्हीएम मशीनबंद झाले आहे. 58 वॉर्डांत सरासरी 50.41 टक्के मतदान झाले असून मागील वेळेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झाले आहे. बुथस्तरीय मतदानाची आकडेवारी घेऊन उमेदवारीच्या विजयाचे गणित मांडण्यात येत आहे.
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदानासाठी 402 मतदान केंदे करण्यात आली होती. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची संख्या एक हजारहून अधिक आहे. त्या ठिकाणी जादाचे मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या 415 झाली होती.
एकूण 385 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्याने सर्वांचे लक्ष आता मतमोजणीच्या तारखेकडे लागले आहे. सोमवार दि. 6 रोजी सकाळी 7 पासून मतमोजणी होणार आहे. काही वॉर्डांमध्ये चुरशीचे मतदान झाल्याने कोण निवडून येणार आणि कुणाचा पराजय होणार? याबाबतच्या चर्चेला ऊत आला आहे. काही वॉर्डांमध्ये 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. तर काही वॉर्डांमध्ये 40 टक्के मतदान झाले आहे. काही वॉर्डांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. काही ठिकाणी निराशाजनक वातावरण दिसून आले. 58 वॉर्डांमध्ये झालेल्या सरासरीचा विचार करताना कुणाला मतदान झाले? राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार किती निवडून येणार? याबाबतच्या गणिताला सुरुवात झाली आहे.
गुरुवारी रात्री पैसे वाटल्याची चर्चा
मराठी भाषिक उमेदवारांना मिळालेला पाठिंबा पाहून काहींनी वॉर्डात गुरुवारी रात्री पैसे वाटल्याची चर्चा आहे. तसेच काही मंडळांनी देखील उमेदवारांकडून मोठय़ा रकमा घेतल्या असल्याचे समजते. काही उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी पैसे देऊन खरेदी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे समोर पराजय दिसत असताना देखील वॉर्डामध्ये नागरिकांना पैसे देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदार पैशाला आणि आमिषाला भुलले का? हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.