मतदार यादीमध्ये फेरफार केल्याचा दावा, जिल्हाधिकाऱयांकडे असंख्य तक्रारी दाखल
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणूक पारदर्शी झाली नसल्याचा आरोप होत असून, याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच वॉर्ड क्र. 32 मधील राष्ट्रीय पक्षाच्या पराभूत उमेदवाराने धारवाड उच्च न्यायालयात धाव घेतली असून, वॉर्ड क्र. 32 मधील निवडणूक पारदर्शी झाली नसल्याने पुन्हा घ्यावी अशी याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालयाने महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिका वॉर्ड पुनर्रचना व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत न्यायालयात वाद सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. निवडणुकीवेळी मतदार यादी देखील व्यवस्थित करण्यात आली नव्हती. तसेच दि. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि 6 सप्टेंबर रोजी मतमोजणी झाली होती. मात्र निवडणुकीदरम्यान काही वॉर्डांमधील मतदारांची नावे फेरफार करण्यात आली होती. वॉर्ड क्र. 32 मधील 932 मतदारांची नावे वॉर्ड क्र. 31 मध्ये दाखल करण्यात आली. वॉर्ड पुनर्रचनेनुसार महानगरपालिकेने मतदार यादी दिल्यानंतर या नावांमध्ये फेरफार करण्यात आला आहे. त्यामुळे मतदार यादीबाबत तक्रार देखील करण्यात आली होती. पण निवडणूक अधिकाऱयांनी याची दखल घेतली नाही. तसेच पारदर्शी निवडणूक झाली नसल्याने अन्याय झाला असून वॉर्ड क्र. 32 ची फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयाने महानगरपालिकेसह निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. सदर नोटीस महापालिकेच्या कायदेतज्ञांना उपलब्ध झाली आहे. सदर याचिकेची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.