द्विसदस्य की चार सदस्य यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यातील होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिकेची निवडणूक द्विसदस्यीय की चार सदस्य प्रभाग रचनेनुसार होणार यावर आज, बुधवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या सुकाणू समितीची मंगळवारी मुंबई येथे बैठक झाली. याबैठकीत प्रभागातील सदस्य संख्येवर सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात सुकाणू समितीच्यावतीने राज्य सरकारला यासंदर्भात सूचना केल्याची माहिती सुत्रानी दिली. दरम्यान, बुधवारी नगरविकास मंत्रालयाच्यावतीने सुकाणू समितीच्या सूचना राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यावर अंतिम निर्णयाची शक्यता असल्याचेही सुत्रांना म्हटले आहे.
महाविकास आघाडीमधील घटक पक्षामध्ये महापालिका, नगरपालिकेतील प्रभागातील सदस्य संख्येवरून मतप्रवाह आहेत. द्विसदस्यी प्रभाग असावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अग्रही आहे. आठ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये यासंदर्भात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे राज्यात यावरून उलट सुलट चर्चा सुरू होती. आता सुकाणू समितीच्या बैठकीतही याच विषयावर चर्चा झाली आहे. त्यामुळे बुधवारी राज्यमंत्रिमंडळ यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वाच्या नजरा आहेत.