कलामंदिरच्या जागेत उभारण्यात येणार भव्य संकुल
प्रतिनिधी / बेळगाव
कलामंदिरच्या जागेत भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱया व्यापारी संकुलासाठी कलामंदीर, भाजीमार्केट, पी. के. क्वॉर्टर्सच्या जागा घेण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयाची जागा देखील घेण्यात आली असून, येथील इमारत हटविण्याचे काम सुरू आहे.
कलामंदिरची इमारत जीर्ण झाल्याने भव्य सभागृह व व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण मनपाकडे निधी नसल्याने प्रस्ताव मार्गी लागला नाही. मात्र स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून व्यापारी संकुल व सभागृह उभारण्याचे काम सुरू आहे.
याकरिता महापालिकेच्या संपूर्ण जागेचा विनियोग करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कलामंदिरची इमारत हटवून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर मागील बाजूस असलेल्या कर्मचारी रहिवासी क्वॉर्टर्सच्या इमारती हटविण्यात आल्या. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टिळकवाडी भागात महापालिकेचे भव्य व्यापारी संकुल उभारण्यासाठी दोन एकर जागेचा वापर करण्यात येणार आहे. तळघरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा, मिनी स्मार्ट भाजीमार्केट, ऑफिस व व्यवसायिक गाळे आणि सभागृह निर्माण करण्यात येणार आहे.
व्यापारी संकुलासाठी येथील भाजीमार्केटमधील व्यावसायिकांना हटवून ही जागा महापालिकेने ताब्यात घेतली होती. काँग्रेसरोड रुंदीकरणावेळी इमारतधारकांना नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी गाळे व जागा देण्यात आली होती. त्या व्यापाऱयांना देखील हटविण्यात आले आहे. मात्र काही व्यापाऱयांनी न्यायालयातून स्थगिती घेतली असल्याने दोन गाळे हटविण्यात आले नाहीत. मात्र अलिकडेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयाची इमारत हटविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या रेल्वे गेटपासून व्यापारी संकुलाच्या इमारतीचा प्रारंभ होणार आहे. शुक्रवारपेठेत भव्य असे व्यापारी संकुल निर्माण होणार आहे. महापालिकेचा कारभार करण्यासाठी चार विभागीय कार्यालयांची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या रेल्वेगेटसमोरील मनपाच्या इमारतीत विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले होते. टिळकवाडी, शहापूर-वडगाव, अनगोळ, मजगाव अशा विविध भागातील नागरिकांना या विभागीय कार्यालयात यावे लागत होते. त्यामुळे त्यांची धावपळ कमी होत होती. येथील व्यापारी संकुलासाठी विभागीय कार्यालयाचे गोवावेस येथील व्यापारी संकुलात स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे ही इमारत हटविण्यात आली आहे.