वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या क्रीडा संकुलात आगामी राष्ट्रीय हॉकी सराव शिबिरासाठी दाखल झालेले भारताचे पाच हॉकीपटू कोरोना चांचणीत दोषी आढळले आहेत. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग, सुरेंद्रकुमार, जेसकरण सिंग, कृष्णन पाठक आणि वरूणकुमार यांची कोरोना चांचणीत घेण्यात आली आणि या चांचणीत ते पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोरोना चांचणी घेतल्यानंतर आपण साईच्या संकुलामध्ये स्वत:हून क्वॉरेंटाईन होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी साईच्या अधिकाऱयांनी सावध उपाय योजना चोखपणे अंमलात आणली असल्याने आपण समाधानी असल्याचे कर्णधार मनप्रितने म्हटले आहे. कोरोना महामारी संकटामुळे हॉकी सराव शिबीर तब्बल चार महिने स्थगित करण्यात आले होते. बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये हॉकीचे राष्ट्रीय सराव शिबीर घेतले जाणार आहे.